लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तलावाचे पुनरुज्जीवन करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणे, तलावाजवळील परिसर स्वच्छ व सुशोभित करणे यावर विशेष लक्ष दिले जात आहे. रामाळा तलावाचे काम मे महिन्याअखेरपर्यंत पूर्णत्वास न्यावे, तलावाचे पाणी स्वच्छ ठेवल्यास इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीचा त्रास होणार नाही, तलावातील गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना अवगत करावे, अशा सूचना राज्याचे पर्यटनमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी विविध कामांचे तसेच रामाळा तलाव सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली.लोकसहभागातून इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी विकासात्मक आराखडा तयार करावा, पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी कुठे वाढते याची माहिती घेऊन संरक्षक भिंतीचे काम करावे, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. तत्पूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील रामाळा तलाव, इरई नदी, बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची हेरिटेज वॉक करून पाहणी केली.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मिताली सेठी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराड, ताडोबा क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेनेकडून जल्लोषात स्वागत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे जिल्ह्यात पहिल्यांदाच आले. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, वरोरा, भद्रावती तसेच चंद्रपूर शहरातील विविध भागामध्ये स्वागत फलक उभारण्यात आले होते.
गोंडकालीन चांदा किल्ला मॉडेलचे आकर्षण- शहराला अकरा किलोमीटरचा परकोट लाभला आहे. गोंडकालीन राजवटीमध्ये या किल्ला परकोटाची उभारणी करण्यात आली. त्याची प्रतिकृती इको प्रोचे सदस्य संजय सब्बनवार यांनी साकारली. हे मॉडेल रामाळा तलाव येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय सब्बनवार यांचे कौतुक केले.- मंत्री आदित्य ठाकरे यांना चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व कमलापूर हत्ती कॅम्पबाबत पुनर्विचार करण्याबाबत इको प्रोने निवेदन दिले. जिल्ह्यातील पर्यावरण संस्था, संघटनांच्याहीवतीने ना. ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.