कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्र सज्ज केली आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना डोस देणे सुरू आहे. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. परिणामी चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. बरेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स अद्याप दुसरा डोस घेऊ शकले नाही. लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, अशा बऱ्याच घटना उघडकीस आल्या. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रासमोर नागरिक गर्दी करीत आहेत. पण डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
३ लाख ५५ हजार ६१० जणांचे लसीकरण
चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत १८ ते ४४ पुढील वयोगट, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक असे मिळून ३ लाख ५५ हजार ६१० जणांनी लस घेतली. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद राहतात. प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी सकाळी आठ वाजतापासूनच केंद्रांवर रांगा लावाव्या लागतात.
१८ वर्षांवरील १० हजार ८७ जणांनी घेतला डोस
१ मे पासून १८ वर्षांवरील तरूणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण सुरूवातीला एकाही केंद्रावर १०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे युवक- युवतींचा हिरमोड झाला.
केंद्र सरकारने १८ वर्षे वयोगटातील लसीकरण लांबणीवर टाकले. जिल्ह्यात १८ वर्षांवरील १० हजार ८७ जणांनी पहिला डोस घेतला. आता या वयोगटाचे लसीकरण बंद आहे. डोस उपलब्ध नसताना केंद्र सरकारने घोषणा का केली, असा संतप्त सवाल युवक-युवती करीत आहेत.
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा तर केंद्र सरकारने अद्याप विचारच केला नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याबाबत पालक काळजीत आहेत.
आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरूवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढा डोस आला तेवढेच कुपन आधी वितरण केले जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. त्यामुळे १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांगेत लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आधी डोस किती आहेत, हे जाहीर करण्याची सूचना नागरिकांनी केली आहे.
लसीकरणासाठी २५० केंद्र
लस देण्यासाठी जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. चंद्रपूर मनपा क्षेत्रातही नवीन केंद्र तयार करून ठेवले. सुरूवातील सर्व केंद्रांवर लसीकरण केल्या जात होते. मात्र, लसीचा तुटवडा सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे १०० केंद्रांवरूनच लस दिली जात आहे.