देवाडा खुर्द : सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या नावाखाली तालुक्यात अतांत्रिक ठेकेदारांनी करोडो रुपयांच्या कामाचा धडाका लावला आहे. यामध्य ेलोकप्रतिनिधी आणि राजकीय वरदहस्त असलेल्यांचाच भरणा असल्याने विकास कामाची पुरती वाट लागत आहे. पन्नास टक्केच्या आसपास ‘मार्जीन’ असल्यामुळे सिमेंट काँक्रिट रस्त्यातच विकास अडकल्याचे दिसून येत आहे.विकास कामासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होतो. ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून केली जातात. परंतु बहुतांश लोकप्रतिनिधीच कंत्राटदाराच्या भूमिकेत आहेत. जास्त पैसे कमीशन मिळत असल्यामुळे सिमेंट रोड तयार करणे एवढाच विकास गृहीत धरला जात असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पुढारी आणि कार्यकर्तेच ठेकेदार झाल्याने अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम करुनही त्याविरुद्ध कुणी बोलायला तयार नाही. दुसरीकडे शासकीय यंत्रणेतील काही लोकांना अशा कामातून जादा कमीशन मिळत असल्याने आणि ठेकेदारांना राजकारण्यांचा आशिर्वाद असल्यामुळे त्याविरुद्ध अधिकारीही तोंड उघडायला तयार नाही. तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये खासगी ठेकेदारांनी आपली दुकानदारी मांडली आहे. जि.प. सदस्यापासून ते पंचायत समिती सदस्य, सभापती तर सरपंचापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारीमध्ये मलिंदा लाटण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. जेवढे जास्त निकृष्ट काम तेवढे जास्त कमिशन ही प्रथा चालविली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक कामाचा बोजवारा उडाला आहे. यामध्ये सिमेंट रस्त्याच्या आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रशासनाने ग्रामपंचायतीला कामाचा विशेष दर्जा दिल्याने आता सरपंच आणि सदस्य ठेकेदारीकडे वळले आहेत, हे विशेष.(वार्ताहर)
लोकप्रतिनिधी झाले काँक्रिट कंत्राटदार
By admin | Published: August 24, 2014 11:23 PM