अधिकाऱ्यांकडून पाहणी : पुरातत्त्व विभाग अधीक्षकांचे आश्वासनचंद्रपूर : जटपुरा गेटवर होणारी वाहतूक कोंडी शुक्रवारी खुद्द नागपूर विभागाच्या पुरातत्त्व विभागातील अधीक्षक नंदीनी बी साहू यांनीच अनुभवली. खोळंबणारी वाहने, वाहनांच्या रांगा, ध्वनी प्रदूषण आणि अपुऱ्या गेटमधून बाहेर पडण्यासाठी वाहनधारकांची चालेली रेटारेटीही अनुभवली. चंद्रपुरातील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडीची समस्या सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारने शुक्रवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी जटपुरा गेटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती समजून घेतली.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी जटपुरा गेटवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले होते. त्या साठी त्यांनी स्वत: पुढकारा घेत चक्क जटपुरा गेटवरच नागरिकांची आणि अधिकाऱ्यांची कॉर्नर बैठक घेवून नागरिकांचे प्रस्ताव ऐकून घेतले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चंद्रपुरात पाचारण करून येथील परिस्थिती त्यांना अवगत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. नागपूर विभागाच्या पुरातत्व विभागातील अधिक्षक नंदीनी बी साहू यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष जटपुरा गेटला भेट देऊन येथील वाहतुकीच्या कोंडीची पहाणी केली. जटपुरा गेटला भेट देण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जटपुरा गेटवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी त्वरित तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी गेटच्या पहाणीदरम्यान दिले.यावेळी आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पुरातत्व विभागाचे मोहम्मद सलाऊद्दीन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
जटपुरावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाय
By admin | Published: January 09, 2016 1:17 AM