कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची करावी
चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांत रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढविली; परंतु नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. चंद्रपूर शहर स्वच्छतेमध्ये राज्यात गौरविण्यात आले होते; परंतु काही जणांच्या रस्त्यावर कचरा टाकण्यामुळे गालबोट लागत आहे.
निराधार योजनेचे अनुदान थकीत
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांत श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी, लाभार्थ्यांना अडचण जात आहे. कोरोनामुळे संकटानंतर आता लाभार्थ्यांना आर्थिक कोंडी होत आहे. लाभार्थी बँकेत दररोज पैशासाठी चक्करा मारत आहेत. मात्र, पैसे आले नसल्याने त्यांना गेल्यापावली परत जावे लागते. लॅाकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आहेत.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील वरोरा नाका चौकामध्ये अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी नव्याने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकाला विशेष महत्त्व आले आहे. मात्र, येथून भरधाव वेगाने वाहन नेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने येथे सिग्नल सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, येथे दोन दिवसांपूर्वीच कंटेनर पलटी झाला होता.
हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर : जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. संबंधित विभागाकडे लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
चिखलाच्या रस्त्यातून शेतकऱ्यांचा प्रवास
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश पांदण रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले नसल्याने शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट शोधावी लागत आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणारे साहित्य नेतानाही मोठी कसरत करावी लागत आहे.