ब्रम्हपुरी : तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव, (चिखलधोकडा), चिचगाव, हळदा, बोळधा हे घाट राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्या रेतीघाटातून मनमानी खनन करून रेती साठवून ठेवले आहे. परंतु त्या जागेची अकृषक मुदत संपली. हे साठे अनधिकृत असल्याने शासनाच्या वतीने जप्त करण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय तुमाने यांनी निवेदनातून केली आहे
तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव, (चिखलधोकडा) हळदा, बोळधा, चिचगाव हे रेतीघाट राज्य खनिकर्म महामंडळाला वार्षिक कालावधीसाठी दिले होते. रेती सुधारित धोरणानुसार मुद्दा क्रमांक पाचमध्ये नमूद केल्याप्रमाणे खनिकर्म महामंडळासाठी वाळूघाट राखीव ठेवले. यातील उपमुद्दा क्रमांक दोनमध्ये वाळू गटातून वाळू उत्खननाची कारवाई महामंडळ स्वतः किंवा ग्रामपंचायतीमार्फत करू शकेल, असा शासनाचा निर्णय आहे. मात्र, वाळूगटातून खननाचे कंत्राट नागपूरच्या एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. यापासून ग्रामपंचायतींना अंधारात ठेवल्याचा आरोप तूमाने यांनी केला आहे. यामध्ये चारही ग्रामपंचायतींचे आर्थिक नुकसान झाले. शासनाचाही महसूला बुडाला. चारही रेती घाटावर खासगी कृषक जागेवरती रेतीसाठा अजुनही आहे. यामधील कृषी जागेची अकृषक मुदत संपली. मात्र, रेतीची वाहतूक सुरूच आहे. अकृषक जागेची परवानगी संपली. जमीन मालकांकडून संमती पत्र लिहून घेतले. परंतु त्या जागेची अकृषक केले नाही. त्यामुळे या चारही घाटावर असलेले रेतीसाठे अवैध असल्याने शासनाने जप्त करून साठेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तूमाने यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.