चंदनखेडा: भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे व्यावसायिक विमानतळ तयार करण्याचा मुद्दा अद्यापही अधांतरी असून त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात राज्यपालांचा दौरा पार पडला. त्यानंतर नागपूर येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी भद्रावतीजवळील व्यावसायिक विमानतळाबाबत माहिती दिली. मात्र तो प्रस्ताव सदोष असून पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची पाळी येणार असल्याचे चित्र आहे. यामुळे विमानतळाचा प्रश्न अधांतरी आहे. शासनाच्या दृष्टीने योग्य असलेल्या चंदनखेडा येथील जागेवर विमानतळ तयार करण्यात यावे व संसद आदर्श ग्रामयोजनेत निवड झालेल्या या गावाच्या विकासाची गती वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळाला व्यावसायिक स्वरूप देण्याची योजना आहे. मोरवा येथील विमानतळाचे तांत्रिकदृष्ट्या विस्तारीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे इतरत्र जागेची पाहणी करुन भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा बेलगाव परिसरातील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र ढोरवासाजवळील निप्पॉन डेन्रो कंपनीची जागा राज्यमार्गाला लागून असल्याने या जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कळते. परंतु भारत सरकारचा उपक्रम असलेली आंध्रप्रदेश ते राजस्थान व्हाया भद्रावती मार्गावर नैसर्गिक वायुची १ हजार ७०४ किलोमीटर लांबीची पावणेतीन फूट व्यासाची पाईपलाईन याच परिसरातून जाणार आहे. त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. तसेच या परिसरालगत कोळसा खाणी, एनटीपीसीचे टॉवर व अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे मोठे टॉवर आहेत. तसेच आयुधनिर्माणीसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन वर्धा नदीवरुन तेलवासा ढोरवासा व निप्पॉन डेन्रोच्या जागेवरुन गेलेली आहे. असे असतानासुद्धा या कंपनीच्या जागेचा प्रस्ताव कसा काय गेला? याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे.याशिवाय या जागेबाबत संबंधित शेतकऱ्यांनी नागपूर न्यायालयातही प्रकरण न्यायप्रविष्ट केल्याची माहिती आहे. त्यामुळे या तांत्रिकबाबी तसेच इतर अडचणींमुळे निप्पॉन डेन्रो कंपनीच्या जागेचा प्रस्ताव सदोष ठरणारा असून त्यामुळे पुन्हा विमानतळ निर्मितीचा घोळ कायम राहण्याची शक्यता आहे. विमानतळासाठी राज्यमार्गाचे कमी अंतर असले पाहिजे, असाच निकष असेल तर चंदनखेडा जवळून नुकताच वरोरा- पावना- सागरा- चंदनखेडा- मुधोली- मोहर्ली ते ताडोबा- चिमूर असा राज्यमार्ग मंजूर होवून कामाच्या निविदाही निघाल्या आहेत. चंदनखेडातील नियोजित विमानतळ क्षेत्र हे या राज्यमार्गाला लागूनच आहे. तसेच येथील शेतजमीनीवर कुठलेही टॉवर किंवा जंगलही नाही. पूर्णत: प्रदूषणविरहीत असा हा परिसर आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेत चंद्रपूर-वणी- आर्णी या लोकसभा क्षेत्रातून चंदनखेडा या ग्रामपंचायतीची खासदार हंसराज अहीर यांनी निवड केली आहे. त्यामुळे त्यांचे या गावाकडे विशेष राहणार आहे. त्यांनीही विमानतळासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)
विमानतळाबाबत चंदनखेडावासीयांमध्ये संभ्रम
By admin | Published: January 10, 2015 1:07 AM