राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटीला जाऊन सामील झाले. आमदार जोरगेवार यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवरून चंद्रपूरची जनता मात्र कमालीची संभ्रमात आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून जोरगेवार यांनी ७० हजारांवर मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. तेव्हापासूनच त्यांच्या भूमिका बदलत असल्याचे बघायला मिळते. निवडून येताच त्यांच्यावर शिवसेना व भाजपने बाजी लावल्याची माहिती आहे. मात्र, जोरगेवार यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी समर्थनार्थ पत्र दिले. हे पत्र देतानाचे छायाचित्र व्हायरल होताच तमाम चंद्रपूरकरांनी त्यांच्यावर कमालीची नाराजी व्यक्त केली. जोरगेवार हे मूळचे भाजपचे होते. २००९ मध्ये चंद्रपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांच्यात आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. मात्र भाजपने ऐनवेळी नागपूरचे नाना श्यामकुळे यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकले. आता भाजपमध्ये राहून आमदार बनणे शक्य नाही म्हणून जोरगेवार यांनी शिवसेनेत उडी घेतली आणि २०१४ ची निवडणूक लढली. ते निवडणूक हरले. मात्र, त्यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणे शक्य नसल्याचे गणित मांडून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. २०१९ च्या निवडणुकीकरिता त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. तरीही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेली रॅली अपक्ष म्हणून निघाली खरी. मात्र, वाहनांमध्ये काँग्रेसचे झेंडेही ठेवले होते. रॅली अर्ध्यात पोहोचल्यानंतर अचानक एबी फाॅर्म मिळाला म्हणून त्यांनी वाहनातील काँग्रेसचे झेंडे उंचावले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारीसाठी चाचपणी सुरू होती. अखेर काँग्रेसचा एबी फाॅर्म रिजेक्ट झाला आणि अपक्ष म्हणून जोरगेवार निवडणूक रिंगणात राहिले. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आधी बाळू धानोरकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्याबद्दल भावनिक वातावरण तयार झाले होते. याची पुनरावृत्ती जोरगेवार यांच्याबाबतही झाली. जोरगेवारांना अपक्ष उमेदवार म्हणून सर्वस्तरारून जोरदार पाठिंबा मिळाला आणि ते मताधिक्याने विजयी झाले. निवडून आल्यानंतरही त्यांचा पक्षाचा शोध संपलेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला. हे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसताच त्यांनी आपला मोर्चा शिवसेना बंडखोरांकडे वळविला. त्यांच्या या बदलत्या भूमिकांवरून चंद्रपूरची जनता मात्र कमालीची संभ्रमात आहे.
किशोर जोरगेवार म्हणतात... अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारसोबत राहून मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. त्यामुळे पुढेही चंद्रपूर मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.