अहेरी/आलापल्ली : अहेरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट अहेरी तालुक्यातील अहेरी व आलापल्ली या दोनही गावात मतदानात काँग्रेस पक्ष प्रचंड प्रमाणात माघारलेला आहे. या भागात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची धुरा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडेच देण्यात आली होती. भाजपच्या प्रचाराचे काम भाजप नेत्यांसह नागविदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते व नेते करीत होते. त्यामुळे भाजपला प्रचंड मताधिक्य या दोन गावांमध्ये मिळाल्याचे दिसून येत आहे. आलापल्ली, अहेरी, नागेपल्ली, मोदुमोडगू आदी ठिकाणच्या २४ मतदान केंद्रावर भाजपला ७ हजार ५१३ तर काँग्रेस उमेदवाराला ४ हजार ५३ मते मिळाली आहेत. या भागात काँग्रेस पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी नाही. जिल्हा परिषदेच्या जागाही या तालुक्यात काँग्रेसच्या कब्ज्यात नाही. अहेरीतील केवळ दोन मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली आहे. नुसत्या अहेरी गावाचा विचार करता १० मतदान केंद्रावर ५ हजार ४७५ मतापैकी भाजपला ३ हजार ४०१, काँग्रेसला १ हजार ८७६, बसपाला १९८ मते मिळाली आहे, अशीच परिस्थिती अहेरी क्षेत्रातील राहिली आहे.
अहेरी-आलापल्लीत काँग्रेसचे वाजले बारा
By admin | Published: May 20, 2014 11:32 PM