Chandrapur: आनंदाच्या भरात काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बेफाम नाचले, व्हायरल व्हिडीओची राजकीय वर्तुळात चर्चा
By राजेश भोजेकर | Published: April 30, 2023 11:31 AM2023-04-30T11:31:23+5:302023-04-30T11:31:34+5:30
Chandrapur: आनंद गगनात मावेनासा झालेले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ढोल, ताशाच्या ठेक्यावर गुलाल उधळीत केलेला डान्स राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.
- राजेश भोजेकर
चंद्रपूर : भाजपशी अभद्र युती करून स्वपक्षीय खासदार बाळू धानोरकर समर्थित चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे गटाचा पराभव केल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झालेले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ढोल, ताशाच्या ठेक्यावर गुलाल उधळीत केलेला डान्स राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.
चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणूकीसाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र येत काँग्रेस आणि भाजप अशी अभद्र युती करून निवडणूक लढविली. खासदार धानोरकर यांच्या पराभवासाठी या युतीला आजी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद होता हे काही लपून राहिलेले नाही. या निवडणूकीत १८ पैकी १२ संचालक भाजप व काँग्रेसच्या युतीचे निवडुन आले.
दरम्यान, खासदार धानोरकर समर्थित चोखारे गटाचा भाजप काँग्रेस अभद्र युतीने पराभव करताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. मात्र, हा विजयोत्सव साजरा करता आपण काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याचे विसरून गेले. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राजकीय विरोधक आहेत. मात्र, चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणूकीत ही ओळख पुसली गेली. खासदार धानोरकर गटाच्या दिनेश चोखारे यांचा पराभव होताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यकत्र्यांसह एकत्र येत गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. या विजयोत्सवाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.