चंद्रपूर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण, महागाई, खासगीकरण व बेरोजगारी विरोधात कॉंग्रेस पक्षाने २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. पक्षाने सर्व शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. रविवारी चंद्रपूर येथे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व महानगर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी पत्रकार परिषदेत भारत बंद आंदोलनाची माहिती दिली.
सत्तेवर येण्यासाठी भाजपने देशातील जनतेला भरमसाट खोटी आश्वासने दिली. जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून सत्तेत आणले. मात्र मागील सात वर्षापासून भाजपने देशात हुकूमशाही राजवट सुरू केली असून मोदी सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. हे कायदे मागे घ्यावेत म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, तरी या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही, असे त्यांनी सांगितले.
तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्याही नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. देशातला तरुण बेरोजगार करून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदीच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने सुरू आहे. या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठविला असून सोमवारी भारत बंदचे आवाहन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, सुनीता अग्रवाल, राजेश अडुर, प्रमोद बोरीकर, किशोर दुपारे उपस्थित होते.
260921\img-20210926-wa0031.jpg
आंदोलनाची माहिती देताना प्रकाश देवतळे, रामू तिवारी व काँग्रेस पदाधिकारी