लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाविकास आघाडीतील काँग्रेसने ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ब्रह्मपुरीतून काँग्रेसचे हेवीवेट नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राजुरातून सुभाष धोटे तिसऱ्यांदा तर चिमुरातून डॉ. सतीश वारजूकर हे दुसऱ्यांदा आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. विशेष म्हणजे, चिमुरात सलग दुसऱ्यांदा कीर्तीकुमार भांगडिया आणि डॉ. सतीश वारजूकर यांच्यात लढत बघायला मिळणार आहे. राजुऱ्यात सुभाष धोटे आणि स्वभापचे अॅड. वामनराव चटप पुन्हा आमने-सामने असतील. येथे भाजप कोणाला उमेदवारी देते, याकडे लक्ष लागले आहे. बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोराचा तिढा कायम आहे.
वडेट्टीवारांचे स्वकर्तृत्वावर राजकारणात वेगळे स्थानब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्याची औपचारिकता तेवढी शिल्लक होती. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिंदेसेना वा भाजप यापैकी कोणत्या पक्षाकडे ही जागा जाते, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. दमदार आणि विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून वडेट्टीवारांची ओळख आहे. वडेट्टीवारांनी स्वकर्तृत्वावर राजकारणात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जमिनीवर पाय आणि सामान्यांच्या जवळ असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.
मागील दहा वर्षांच्या काळात ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे. या मतदारसंघात त्यांच्या काळात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. सतत जनसंपर्कात राहून जनतेच्या मदतीला धावून जात असल्यामुळे ते लोकनेता म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या रूपाने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तगडा उमेदवार दिला आहे. आता त्यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.