चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण आहे. या सहाही जागा काँग्रेसनेच लढविल्या पाहिजे, असा अहवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. आमदार धोटे यांच्या दाव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा अहवाल सादर केला. या अहवालात चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे ठासून सांगितले आहे. जिल्ह्यात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सहाही जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. या सहाही ठिकाणी काँग्रेस पक्ष खूप जास्त मजबूत आहे. या सहाही विधानसभा काँग्रेसनेच लढवाव्यात, अशी भक्कम भूमिका आमदार धोटे यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने मांडली. यावर मंथन होऊन कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या भूमिकेला हिरवा झेंडा दाखविला असल्याचे आमदार धोटे यांचे म्हणणे आहे.
मविआतील घटकपक्षांची अडचण
महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट आणि शिवसेना (उबाठा) हे दो घटक पक्ष आहे. शरद पवार गट आणि उद्धवसेनेचा बल्लारपूर विधानसभा मतदार संघावर डोळा आहे. मागील काही महिन्यांपासून उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे हमखास तिकिट मिळतील, या आशेने बल्लारपूरात तळ ठोकून आहे. पक्षप्रमुखांनीच तसे आदेश दिल्याचे गिऱ्हे खासगीत सांगत आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचाही या जागेवर डोळा आहे. २०१९ मध्येही त्यांनी या जागेसाठी प्रयत्न केले होते. यावेळीही ते येथून इच्छुक आहे. आता काँग्रेसने सहाही जागांवर दावा केल्याने मविआतील या घटक पक्षांची चांगलीच अडचण होईल, असे दिसते.
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना
सध्या तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील या सहाही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.- आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर.