लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ३४.०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी करून राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारची शेतकऱ्यांप्रतीची संवेदनशीलता या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाशी निगडीत असल्याने विरोधकांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे सोडून काँग्रेसकडून सरकारवर टिका केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून होणारी टिका हा प्रकारच हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली आहे.ना. अहीर पुढे म्हणाले, सन २००९ मध्ये केंद्रातील तत्कालीन संपुआ सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा झाला नव्हता. मात्र विद्यमान राज्य सरकारने स्वत:च्या दिमतीवर ३४ हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज माफ करून राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. एवढेच नव्हे तर देशात सर्वाधिक म्हणजे दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून व ज्यांनी कर्जाची परतफेड मुदतीत केली, त्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यातून शेतकऱ्यांप्रती असलेल्या पारदर्शी भूमिकेचा प्रत्यय येतो. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून या कर्जमाफीचा उल्लेख होत असल्याचे ना. अहीर यांनी म्हटले आहे.
कर्जमाफी तरीही काँग्रेसची टीका हास्यास्पद : अहीर
By admin | Published: June 27, 2017 12:43 AM