चंद्रपूरच्या चार बाजार समित्यांवर काँग्रेस तर दोनवर भाजपाचे वर्चस्व
By राजेश भोजेकर | Published: April 29, 2023 03:18 PM2023-04-29T15:18:22+5:302023-04-29T15:23:20+5:30
तीन ठिकाणी काँग्रेस-भाजप युतीचा डंका
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल शनिवारी हाती आले. यामध्ये कोरपना, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने तर चिमूर आणि नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश संपादन वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून तर नागभीड बाजार समिती भाजपने काँग्रेसकडून हिरावून घेतली आहे. चंद्रपूर आणि राजुरा बाजार समिती काँग्रेस आणि भाजपने युती करून लढली आणि या दोन्ही बाजार समित्यांवर सत्तांतर घडून आले आहे.
चंद्रपूर बाजार समितीवर दिनेश चोखारे यांच्या रुपाने काँग्रेसचीच सत्ता होती. तर राजुऱ्यात शेतकरी संघटनेची सत्ता होती. या निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. यामध्ये केवळ खासदार धानोरकर आणि माजी आमदार ॲड. चटप यांना एकाही बाजार समित्यांमध्ये आपल्या आघाड्यांना यश मिळवून देता आले नाही. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी उभ्या केलेल्या आघाड्यांना सपशेल अपयश आले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
चंद्रपूर आणि राजुरा बाजार समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप युतीला मोठे यश आले आहे. या युतीने चंद्रपूर बाजार समितीच्या १२ तर राजुरा बाजार समितीच्या १५ जागा बळकावून दोन्ही ठिकाणच्या सत्ता उलथवून टाकल्या आहे. राजुऱ्यात आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर चंद्रपूरात ना. सुधीर मुनगंटीवार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व बघायला मिळणार आहे. आमदार बंटी भांगडिया यांच्या चिमूर मतदार संघातील चिमूर व नागभीडमध्ये भाजप समर्थित आघाडीला भरघोष यश मिळविले आहे. चिमूरात तब्बल १८ पैकी १७ तर नागभीड बाजार समितीमध्ये १४ जागांवर यश मिळविले आहे. यामध्ये चिमूरात पहिल्यांदाच भाजपने बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही बाजार समित्यांवर काँग्रेस आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित करीत भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिंदेवाहीत काँग्रेसने येथे १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवित भाजपची सत्ता उलथवून टाकली आहे. ब्रह्मपुरीतही काँग्रेसने १८ पैकी १४ जागा जिंकून सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे.
मूल कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. एकीकडे आमदार विजय वडेट्टीवार गटाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तर दुसरीकडून खासदार धानोरकर गटाची धुरा माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश मारकवार आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांच्या खांद्यावर होती. मात्र ही निवडणूक एकतर्फी झाली. संतोष रावत यांच्या आघाडीने सर्व १८ जागांवर विजय संपादन करून दुसऱ्या गटाचा धुव्वा उडविला. वरोरा बाजार समितीचा निकाल हाती आलेला नव्हता. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मनसे युतीचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळाली. येथे खासदार धानोरकर आणि शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढले.
चंद्रपूर जिल्हा - एकूण ९ बाजार समिती निकाल
१. चंद्रपूर - काँग्रेस-भाजप आघाडी - १२, चोखारे गट - ०६
२. राजुरा - काँग्रेस-भाजप आघाडी - १५, शेतकरी संघटना - ०३
३. कोरपना - काँग्रेस - १३, शेतकरी संघटना+गोंगप - ०५
४. ब्रह्मपुरी - काँग्रेस - १४, भाजप- ०४
५. सिंदेवाही - काँग्रेस - ११, भाजप - ०७
६. मूल - काँग्रेस - १७, अपक्ष -०१
७. चिमूर - भाजप - १७, काँग्रेस -०१
८. नागभीड - भाजप - १४ काँग्रेस - ०४
९. वरोरा - राकाँ+भाजप+मनसे+काँग्रेस युती आघाडीवर