वरोरा : पक्षश्रेष्ठींंचा आदेश झुगारून इंदिरा काँग्रेसचे चार नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने काँग्रेस नगरसेवकांत फुट पडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी इंदिरा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता दोनच उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.१४ जुलै रोजी वरोरा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. काँग्रेसच्या रंजना पुरी व दिपाली टिपले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनाबाई पिंपळशेंडे व शिल्पा रूयारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी काँग्रेसच्या रंजना पुरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा रूयारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या दिपाली टिपले व राष्ट्रवादीच्या जनाबाई पिंपळशेंडे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. वरोरा नगरपालिकेत काँग्रेसचे दहा सदस्य आहेत. त्यातील चार सदस्यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश झुगारून देत ते अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यामुळे कॉंग्रेसच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. अज्ञातस्थळी रवाना झालेल्या चार सदस्यांची मने वळविण्याचे प्रयत्न काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असले तरी अद्यापही त्यात यश आल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, भाजपा व मनसेचे प्रत्येकी एक अशी ११ सदस्य संख्या झाली असून काँग्रेसच्या चार सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जनाबाई पिंपळशेंडे यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. काँग्रेससोबत आजघडीला पक्षाचे सहा, शिवसेनेचा एक व एक अपक्ष असे आठ सदस्य आहेत. निवडून येण्यासाठी १२ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे अज्ञातस्थळी रवाना झालेल्या काँग्रेसच्या चार सदस्यांना परत आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने व्हीप जारी केला आहे. त्यांनी आदेश झुगारल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याकरिता कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याची माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे अज्ञात स्थळी रवाना झालेले इंदिरा काँग्रेसचे सदस्य त्याला किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकूणच येथील राजकीय वातावरण तापत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट
By admin | Published: July 12, 2014 1:01 AM