लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आघाडीने नगराध्यक्षपदासह तब्बल ११ जागा जिंकून बहुमतासह नगर परिषदेवर झेंडा फडकविला. विशेष म्हणजे भाजपा या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.भाजपाला सात जागांचा फटका बसला असून केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. सत्ताधारी विदर्भ माझा पार्टी ६ जागांवरच स्थिरावली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीतही काँग्रेसच्या रिता दीपक उराडे यांनी ८,०२० मते घेऊन भाजपच्या यास्मीन बहादूर लाखानी यांचा ३ हजार ५५० मतांनी पराभव केला. लाखानी यांना ४,४७० मते मिळाली. काँग्रेसने भाजपला धक्का देत तब्बल २५ वर्षांनंतर प्रथमच स्पष्ट बहुमत मिळविल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.जनतेतून नगराध्यक्षपद व १० प्रभागातून २० नगरसेवकपदासाठी रविवारी मतदान झाले. काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आघाडी, भाजपा, विदर्भ माझा पार्टी, बहुजन समाज पार्टी, शिवसेना, भारिप-बहुजन महासंघाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सर्वच प्रभागात उमेदवार रिंगणात उतरविले होते. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, भाजपाचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, विदर्भ माझा पार्टीचे प्रमुख अशोक भैय्या यांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली होती. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसने विजयी घोडदौड सुरू केली. काँग्रेसने ११ जागांवर विजय संपादन करून स्पष्ट बहुमत मिळविले. नगराध्यक्षही काँग्रेसचा विजयी झाल्याने काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे.विजयी रॅलीने शहर दुमदुमलेनिकाल जाहीर होताच काँग्रेसच्यावतीने शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिता उराडे, भाऊसाहेब जगनाडे, खेमराज तिडके, हितेंद्र राऊत, राम मेश्राम, अरूण कोलते, प्रा. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, थानेश्वर कायरकर, काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर स्थापनेपासून पहिल्यांदाच काँग्रेस- रिपाइंला बहुमत मिळाले आहे. जनतेकडून मिळालेला कौल प्रस्थापितांच्या विरोधात असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा हा निकाल आहे. जातीयवादी विचारांना घेऊन समाजामध्ये दरी निर्माण करणाऱ्यांना या निकालाने स्पष्ट नकार दिला. मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखविला. आम्ही सदैव ऋणी आहोत.-विजय वडेट्टीवार, आमदार, ब्रह्मपुरी.जनतेने माझ्यावर व काँग्रेसचे कुशल नेतृत्व आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर विश्वास ठेवला. नागरिकांच्या प्रश्नांविषयी सजग राहून शहराचा विकास करणार आहे.- रिता उराडे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, ब्रह्मपुरी.कमी वयाचे नगरसेवककाँग्रेसने यावेळी युवा नेतृत्वाला उमेदवारी दिली. यामध्ये प्रितिश बुरले हे उमेदवार सर्वात कमी वयाचे आहेत. बुरले यांना अवघ्या २३ वर्षांच्या वयात जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिले आहेत.दिग्गज पराभूतनिवडणूक रिंगणात शहरातील बंटी श्रीवास्तव, शब्बी अली जिवानी, मनोज भूपाल, आस्मीन लाखानी, अर्पिता दोनाडकर, मोंटू पिलारे, अनकुल शेंडे, अविनाश राऊत ही दिग्गज मंडळी उतरली होती. त्यांची प्रचारातही जोरदार मुसंडी मारली होती. जनतेला पचणी न पडल्याने या दिग्गजांना पराभवाचे तोंड पहावे लागले.
ब्रह्मपुरी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:39 AM
ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आघाडीने नगराध्यक्षपदासह तब्बल ११ जागा जिंकून बहुमतासह नगर परिषदेवर झेंडा फडकविला. विशेष म्हणजे भाजपा या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
ठळक मुद्देभाजपला सात जागांचा फटका : काँग्रेसच्या रिता उराडे नव्या नगराध्यक्ष