सुभाष धोटे यांनी गड राखला : ११ जागा काँग्रेसकडे तर ७ जागांवर संघटना विजयीकोरपना : कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीची रविवारी निवडणूक पार पडली. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी घेण्यात आली. यात काँग्रेसने १८ पैकी ११ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना अशी थेट लढत होती. मात्र शेतकरी संघटनेला फक्त ७ जागांवर समाधान मानावे लागले.काँग्रेसचे नेते तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आ. सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शेखर धोटे, काँग्रेसचे जिवती तालुका अध्यक्ष गोदरू पाटील जुमनाके, कोरपना तालुका अध्यक्ष विठ्ठल थिपे, उत्तम पेचे, शामसुंदर राऊत, कोरपना व जिवती तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्वीकारत १८ पैकी ११ जागांवर विजय मिळविला. सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून काँग्रेसचे भाऊराव हिरामण चव्हाण (१३७), श्रीधर नारायण गोडे (१३६), दिवाकर बालाजी बोरडे (१३४), योगेश्वर त्र्यंबक गोखरे (१३२), ममता नंदू जाधव (१२७), निशिकांत रेषमा सोनकाबळे (१२७), अशोक भाऊराव मासीरकर (१२४) हे विजयी झाले. सहकारी संस्था मतदार संघ महिला गटातून काँग्रेसच्या साधना विलास वाभीटकर (१३५), ज्योत्स्ना उत्तम वैरागडे (१३४) तर इतर मागासवर्गीय गटातून शेतकरी संघटनेचे पांडुरंग धोंडूजी वासेकर (१२९) हे विजयी झाले. वि.जा./भ.ज./वि.मा. गटातून काँग्रेसचे अशोक माधव आस्कर (१३१) व ग्रामपंचायत गटातून शेतकरी संघटनेचे प्रल्हाद दीपचंद पवार (३३२), सुरेश गंगाराम राजुरकर (३०९), भीवसन सिंगा जुमनाके (३२५), माधव कान्हू पेंदोर (३२१) हे विजयी झाले. व्यापारी गटातून शेतकरी संघटनेचे भालचंद्र बळीराम बोडखे (८२) व पांडुरंग विश्वनाथ आवरी (५९) हे विजयी झाले. हमाल गटातून काँग्रेसचे शेख एजाज दादन (३०) हे विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून आर. डी. कुमरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून एस. आर. खांडरे यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)
कोरपना बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा
By admin | Published: February 23, 2016 12:39 AM