सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा

By राजेश भोजेकर | Published: August 4, 2023 12:14 PM2023-08-04T12:14:54+5:302023-08-04T12:15:28+5:30

करंजी ते व्हाया गडचिरोली, चिमूर, ब्रह्मपुरी खडतर प्रवास

congress leader vijay wadettiwar once again became the leader of the opposition | सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा

सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा

googlenewsNext

राजेश भोजेकर

चंद्रपूर : माजी मंत्री, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागल्याने दिग्गजांच्या मांदियाळीत चंद्रपूर जिल्हा उठून दिसणार आहे. सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आल्याने या पदाने चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विदर्भातून सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही येतात. याच विदर्भाकडे विरोधी पक्षनेतेपद देऊन पक्षाचा बालेकिल्ला अधिक मजबूत करतानाचा भाजपला मात देण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचे मानले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने याचा मोठा फायदा होईल, अशी चंद्रपूरकरांची अपेक्षा आहे. वडेट्टीवार यांच्या संघर्ष थक्क करणारा असाच आहे.

विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा जन्म गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात झाला. त्यांचे वडील करंजीचे दहा वर्षे सरपंच होते. चौथ्या वर्गात असतानाच वडिलांचे छत्र हरपले. सातवीपर्यंत गोंडपिपरीत शिक्षण घेतले. मोठ्या भावाला व्यसन जडल्याने परिस्थिती बेताची होती. आईला गावची शेती विकावी लागली. वाट खडतर होती. कसेबसे बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले. अशातच युवक चळवळीशी संबंध आला. बेरोजगारांची संघटना उभारली. टायपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तुलतुली प्रकल्प कार्यालयात नोकरी पत्करली. यातूनच प्रशासनातील अनुभव येत होता. बाकी परिस्थितीने शिकविले.

आदिवासींच्या जागा निघाल्या की मुंबईसह अन्य शहरी भागातील बोगस आदिवासी त्या जागा बळकवायचे. वृत्तपत्रात आलेल्या नोकरीच्या जाहिराती बरोजगारांपर्यंत पोहचवायचे काम केले. अशातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात शिवसेनेचे जाळे पसरविणे सुरू केले. तरुणांना त्यांचे आकर्षण होते. १९८८ मध्ये ते शिवसेनेचे पहिले गडचिरोली शहर प्रमुख झाले. अवघ्या दोन वर्षांत जिल्हाप्रमुख, १९९० मध्ये तब्बल ५१३ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकविला. १९९५ मध्ये शिवसेनेचा एक आमदार निवडून आणला. राज्यात शिवसेना-भाजप सत्ता आली. लगेच बाळासाहेबांनी मुंबईत बोलावून घेतले. राज्यमंत्र्यांच्या दर्जाच्या वनविकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली. यानंतर वडेट्टीवार यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. वडेट्टीवारांपुढे स्वपक्षातील आव्हानांचा सामना करताना जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे मोठे आव्हान आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या अपेक्षा

विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचा मुद्दा उपस्थित केला. गोरगरीब जनतेच्या वेदना मांडल्या, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, दलित, आदिवासी व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ही संधी असल्याचे सांगितले. जमिनीवर पाय असलेल्या या नेत्यांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, उद्योग, बेरोजगारांचा प्रश्न, ओबीसींचे प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: congress leader vijay wadettiwar once again became the leader of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.