काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:24 AM2023-05-31T01:24:54+5:302023-05-31T01:25:53+5:30
नवी दिल्लीत मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तीन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते.
चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (वय ४८) यांचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीत मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तीन दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. त्यांच्या अकाली निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शोककळा पसरली.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांना किडनी विकारावरील उपचारासाठी बुधवारी (दि. २४) नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले होते. त्याचदरम्यान वडील नारायण धानोरकर यांच्यावरही नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, शनिवारी (दि. २७) त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाही. त्यानंतर रविवारी (दि. २८) अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, मंगळवारी पहाटे ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, मानस आणि पार्थ ही दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, धानोरकर यांचे पार्थिव नवी दिल्लीहून एअर ॲम्ब्युलन्सने मंगळवारी दुपारी दोन वाजता नागपुरात आल्यावर तेथून वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात आले. बुधवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.