जि. प. व पं. स. निवडणूक : निवड समितीचे प्रमुख गोपालदास अग्रवाल यांची उपस्थितीचंद्रपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी जिल्हा निवड समितीकडे जिल्ह्यातील शेकडोंवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली. जिल्हा निवड समितीचे प्रमुख आ. गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.येथील चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील इंटक कार्यालयात सकाळी ११.३० वाजतापासून तालुकास्तरीय उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी निवड समितीचे प्रमुख गोंदियाचे आ. गोपालदास अग्रवाल यांच्यासह विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आ. सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आ. डॉ. अविनाश वारजूरकर, शहराध्यक्ष नंदू नागरकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, घनश्याम मुलचंदानी, डॉ. आसावरी देवतळे, प्रभारी माजी आ. एस.क्यू. जामा, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर यांची यावेळी उपस्थिती होती.प्रत्येक गट व गणासाठी तीन ते चार इच्छूक उमेदवार मुलाखत देण्यासाठी आल्यामुळे दुपारी १२ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या. मुलाखत देण्यासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यातील उमेदवारांनी समर्थकांसह हजेरी लावल्याने इंटक कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.इच्छूक उमेदवारांचे समर्थक घोषणाबाजी करून निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, उमेदवार व समर्थकांच्या गर्दीमुळे मंडप अपुरा पडला. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नव्हती. गर्दीमुळे सगळेच नियोजन ढासळल्याने कार्यकर्त्यात नाराजी दिसून आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के वाटा मिळाल्याने महिला उमेदवारांची संख्याही लक्षणीय होती. तरीही ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून काँग्रेस पक्षावर निष्ठा दर्शविली. उमेदवारी कोणाला मिळणार, याची चर्चा कार्यकर्ते आपआपसात करीत होते. येत्या २४ जानेवारीला तिकीट मिळणाऱ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छूक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)इच्छुकांच्या मुलाखती, २५ जानेवारीला शिवसेनेची पहिली यादीचंद्रपूर : आगामी जि.प.-पं.स. निवडणुकीसाठी शिवसेनेने स्थानिक राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी इच्छूक उमेदवारांच्या मुखालती घेतल्या. त्यामध्ये इच्छुकांनी गर्दी केल्यामुळे २४ जानेवारीपासून मतदारसंघाचा दौरा करून प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पहिली उमेदवार यादी २५ जानेवारी जारी करण्यात येणार आहे.शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख आ. बाळू धानोरकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये शिवसैनिकांंना स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन या नेत्यांनी केले. यावेळी आ. धानोरकर यांनी नऊ नगरसेवक निवडून आणल्याबद्दल त्यांचा वडले व जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मेळाव्यानंतर जि.प. व पं.स.च्या मतदारसंघासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उपनेते वडले व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीदरम्यान, उमेदवारांनी गर्दी केल्यामुळे शुक्रवारी उमेदवार निश्चित करण्यात आले नाहीत. त्याकरिता आ. बाळू धानोरकर व उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी २४ जानेवारीपासून जिल्ह्यात दौरा करणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची नावे ठरविण्यात येणार आहेत. मेळाव्याचे संचालन प्रफुल्ल कुलगमवार यांनी केले.यापूर्वीच उपजिल्हा प्रमुख जोरगेवार यांनी कोरपना, गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा आदी तालुक्याचा दौरा करून इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)
उमेदवारीसाठी काँग्रेसकडे रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 12:38 AM