पक्षनिरीक्षकानी साधला संवाद : दोन ठिकाणी पार पडल्या बैठकी चंद्रपूर : काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांत सुरू असलेली गटबाजी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वरिष्ठ नेतेही मार्गदर्शन करीत आहेत. असे असले तरी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी स्थानिक पातळीवर प्रकर्षाने जाणवते. याचा प्रत्यय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक एस. क्यु. झामा हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात आले असता, त्यांच्या दोन ठिकाणी आयोजीत बैठकांवरून पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटी व ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय विश्रामगृहात मंगळवारी सायंकाळी ४ वाजता पक्ष निरीक्षक एस.क्यु. झामा व महाराष्ट प्रदेश सचिव प्रमोद तितरमारे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आ. सुभाष धोटे, माजी आ. देवराव भांडेकर, माजी आ. अविनाश वारजूकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश सचिव आसावरी देवतळे, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड.विजय मोगरे, सुनीता लोढीया, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, प्रकाश मारकवार, सतिश वारजूकर, के.के. सिंग, बाजार समितीचे सभापती दिनेश चौखारे आदी उपस्थित होते. तर दुसऱ्या गटाची बैठक गांधी चौकातील चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माजी खा. नरेश पुगलिया यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, चिमूरचे माजी आ. डॉ.अविनाश वारजूकर, सतीश वारजूकर, विनोद अहीरकर, डॉ. सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापूरे, प्रवीण पडवेकर, संजय महाडोळे, बापू अन्सारी, सुधाकरसिंग गौर, प्रशांत दानव आदी उपस्थित होते. दोन्ही बैठकांमध्ये पक्ष निरीक्षक एस. क्यु. झामा व महाराष्ट प्रदेश सचिव प्रमोद तितरमारे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली व एकसंघतेने कार्य करून सत्ता काबीज करण्याचा मुलमंत्र दिला. मात्र मागील काळात पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी झालेल्या चुका समजून घ्यायला स्थानिक पदाधिकारी तयार नाही. त्यामुळे गटबाजी कायम असल्याचा प्रत्यय पक्ष निरीक्षकाच्या बैठकीत आला. (स्थानिक प्रतिनिधी)मतभेद दूर करण्यासाठी मुबंई व दिल्लीत बैठक२०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणूक संदर्भात दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाली. तसेच नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक आणि पक्ष संघटनात्मक चर्चा झाली. काही पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहर व ग्रामीणमध्ये एक वाक्यता आणण्याकरिता विचार मांडले. यावेळी पक्ष निरीक्षक एस.क्यु. झामा व प्रदेश सचिव प्रमोद तितरमारे यांनी चंद्रपूर शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये आपसामधील मतभेद दूर करण्यासंबंधात व येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश मिळविण्याकरिता दिल्ली आणि मुंबई येथे बैठक घेतली जाईल व आपसातील मतभेद दूर करण्याकरिता प्रयत्न करणार, असे सांगितले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
By admin | Published: July 20, 2016 12:39 AM