सावली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दुपटीने भाववाढ केल्याने सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, सदर कायदे धनदांडग्यांच्या हिताचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी हा बंदूआ मजदूर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तिन्ही कायदे रद्द करून कृषी हमीभावाला संवैधानिक दर्जा प्राप्त करून शेतकरी हिताचे कायदे करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप गड्डमवार यांनी मोर्चाला संबोधित करताना केले.
केंद्र सरकारच्या भाववाढीच्या निषेधार्थ गुरुवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सावलीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश चिटनूरवार, तालुकाध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज शेरकी, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन दुवावार, राजेश सिद्धम आदी कार्यकर्ते मोर्चादरम्यान उपस्थित होते.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या काळात सुमारे १५५ शेतकऱ्यांना आपल्या जिवाचे बलिदान द्यावे लागले. तरीसुद्धा केंद्र सरकार उद्दामपणे वागत असून, शेतकऱ्यांचा आक्रोश दुर्लक्षित करीत आहे. काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मोर्चाचे आयोजन करून केंद्र सरकारने त्वरित शेतकरी विरोधातील तिन्ही कायदे मागे घ्यावेत आदी मागण्यासह सावलीचे तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.