चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीने निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली. या अनुषंगाने मतदारसंघातील सर्व १७ तालुक्यांतील काँग्रेस अध्यक्षांकडून माहिती जाणून घेतली.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघ आणि तालुका पातळीवर काँग्रेसची स्थिती भक्कम असल्याची बाब पुढे आली आहे. लवकरच विधानसभानिहाय बैठका घेऊन ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. यानंतर लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर अहवाल काँग्रेस श्रेष्ठींना पाठविणार आहे, अशी माहिती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
काँग्रेसच्या दृष्टीने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा घेण्यासाठी नितीन राऊत बुधवारी चंद्रपुरात आले होते. तालुकानिहाय आढावा बैठकीतून संघटन बांधणी, बुथ कमिट्या आणखी मजबूत करण्यावर भर देण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुढील काळात गाव अध्यक्ष, शहर, नगर परिषद क्षेत्र, मनपा क्षेत्रात मोहल्ला अध्यक्ष निवडीवर भर दिला जाणार असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, मुजीम पठाण, विनोद दत्तात्रेय, नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेतेपदामुळे जिल्ह्यात काँग्रेसला बळ
चंद्रपूर जिल्ह्याला आमदार विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने राज्याचे विरोधी पक्ष नेतेपद मिळाले आहे. याचे चांगले परिणाम भविष्यात बघायला मिळतील. या पदामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद वाढली आहे. काँग्रेसच्या मजबुतीसाठी या पदाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा यावेळी काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
शरद पवारांच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष
शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत देशाच्या राजकारणात नेहमीच संभ्रम राहिला आहे. असे घडायला नको. काँग्रेसश्रेष्ठी त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. शरद पवार आणि अजित पवार भेटीने अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांनी अशी भूमिका घेऊ नये. परिवार वेगळा आणि राजकारण वेगळे आहे, हे समजून घेतले पाहिजे. मात्र, विचाराच्या लढाईत शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत राहतील, असा विश्वासही नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.