‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; आमदार, खासदार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 11:19 AM2022-06-28T11:19:21+5:302022-06-28T11:23:28+5:30
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे वरोरा आणि राजुरा येथे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे वरोरा आणि राजुरा येथे आंदोलन करण्यात आले. वरोरा येथील डॉ. आंबेडकर चौकात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात माजी आमदार अविनाश वारजूरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे आदींची उपस्थिती होती. यावेळी आंबेडकर चौकातून काँग्रेसचे पदाधिकारी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकले. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
अग्निपथ योजना केंद्र सरकारने माघारी घ्यावी : सुभाष धोटे
राजुरा तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांमध्ये केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने ही योजना तातडीने मागारी घेऊन नवजवानांना त्यांच्या भविष्याची खात्री देणारी पूर्वीचीच सैन्य भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली.