सेवादलाशी नाळ तुटल्यानेच काँग्रेसचे ऱ्हासपर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:44 AM2018-03-30T00:44:56+5:302018-03-30T00:44:56+5:30
महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्र्राप्तीनंतर आधुनिक भारताच्या पूनर्रचनेसाठी काँग्रेस सेवादलाची भूमिका ऐतिहासिकच आहे.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्र्राप्तीनंतर आधुनिक भारताच्या पूनर्रचनेसाठी काँग्रेस सेवादलाची भूमिका ऐतिहासिकच आहे. याच संस्कार शाळेतून लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी वाट्टेल त्या खस्ता खाऊन कणखर नेतृत्व उदयास आले. नेतृत्व घडविणाºया मातृसंस्थेकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसची वाताहात सुरू झाली. सेवादलाने देशाला दोन राष्ट्रपती, चार पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्री दिले, हा इतिहास कसा विसरणार? पण, काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते घडविण्याचा मार्गच बंद झाला. काही काँग्रेस नेत्यांनीच सेवादलापासून काँग्रेसला दूर नेले. काँग्रेस पक्षाचे सुरू झालेले हे ऱ्हासपर्व याचाच भाग आहे, ही खंत सेवादलाच्या ज्येष्ठ पदाधिकाºयांनी ‘लोकमत’ व्यासपीठावर व्यक्त केली.
यावेळी सेवादलाचे माजी प्रांत संघटक दलित मित्र देवराव दुधलकर, जिल्हा मुख्य संघटन अशोक आक्केवार, जिल्हा संघटिका प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष मानिकराव दुधलकर, ज्येष्ठ कार्यकर्ते व सर्वोदय मंडळाचे ईश्वर गहुकर आदी उपस्थित होते.
काँग्रेस सेवादलाच्या स्थापनेचा इतिहास कथन करताना देवराव दुधलकर म्हणाले, पद्मभूषण डॉ. ना. सू. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्व कालखंडात हिंदुस्थानी सेवादलाची स्थापना झाली. देशाला स्वातंत्र मिळवून देणे, स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाच्या दृष्टीने पूनर्रचना करणे आणि त्यासाठी लागणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांची जडघडण करुन काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवणे हे हिंदुस्थानी सेवादलाचे उद्दिष्ट होते. पद व प्रतिष्ठेला गौण स्थान होते. साधे सदस्यत्व स्वीकारून अत्यंत निष्ठेने देशासाठी कार्य करणाऱ्या मूल्यांना महत्त्व होते. प्रत्येक कार्यकर्ता व सदस्याला किमान २० विधायक कामे करावी लागत होती. सामाजिक उन्नतीसाठी अनुशासनाची मूल्यनिष्ठा प्राणपणाने जोपासणारे असंख्य कार्यकर्ते देशभरात तयार झाले. काँग्रेसला देशभरात पोहोचविण्यासाठी सेवादलाची मूल्यनिष्ठा आणि समतेचा विवेकी विचार उपयोगी आला. पण, आजची परिस्थिती अतिशय विदारक आहे. काँग्रसने सेवादलाला दुय्यम स्थान दिल्याने सुरू असलेली पडझळ पाहून मन उदास होते, असे मत दुधलकर यांनी नोंदविले. पाटणा येथे घडलेल्या एका प्रसंगाचीही आठवण केली.
महात्मा गांधीजींचा अहिंसात्मक लढा यशस्वी होण्यासाठी सेवादलाच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम कामी आले होते. निष्ठावंत, सहिष्णू वृत्ती व समकालिन वास्तवाची जाणिव ठेवून कठोर मनोनिग्रहाने कार्यकर्ता घडविण्याची सेवादल ही ‘संस्कार शाळा’ असल्याचे सांगून माजी जिल्हाध्यक्ष माणिकराव दुधलकर म्हणाले, गांधीजींचे प्रत्येक आंदोलन यशस्वी करण्याचे दायित्व सेवादलाने स्वीकारले होते. तत्कालिन बंदीची तमा न बाळगता डॉ. हर्डीकरांनी देशभरात संवादसूत्र तयार केले.
१९३१ ला हिंदुस्थानी सेवादलाचे काँग्रेस सेवादल असे नामांतरण झाले. आदर्श नागरिक घडविणे, या मूल्यतत्वावर पंडित जवाहर नेहरूंचा प्रचंड विश्वास होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसला सेवादलातूनच कणखर नेतृत्व पुरविले जात होते. बालक, युवक-युवती ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करून लोकशाही, धर्मनिरपेक्षतेचा विचार देशात पोहोचविण्यासाठी सेवादल हेच एकमेव आशास्थान होते. ही संस्कारशाळा का दुभंगली, असे विचारताच दुधलकर पुढे म्हणाले, पंडित नेहरूंपर्यंत हा तत्वनिष्ठ वारसा कायम होता. त्यानंतर काँग्रेसचे राजकीय अंतरंग बदले. राजकीय नफा-तोट्याच्या विचाराने पक्षाअंतर्गत वेगवेगळ्या आघाड्या तयार झाल्या. सेवा दलाचे अनुशासन काहींना अवास्तव वाटू लागले. कार्यकर्ता घडविणाºया सेवादलच्या ‘स्पिरीट’कडे दुर्लक्ष करण्यात आले. राजकीयदृष्ट्या संख्यात्मक डोके मोजून सत्ता मिळविण्याचे मनसुबे रचणाऱ्यांची पक्षात गर्दी वाढली.
प्रगल्भ विचारणीचा कार्यकर्ता घडविणाऱ्या सेवादलकडे कानाडोळा करण्यात आला. यातूनच काँग्रेसचे ऱ्हासपर्व सुरू झाले. जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात हीच स्थिती आहे. हे ऱ्हासपर्व रोखण्याची क्षमता केवळ सेवादलात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अशोक आक्केवार म्हणाले, काँग्रेसला कार्यकर्ते पुरविणाºया सेवादलाला राजकीय नेत्यांनी पडझळीच्या अवस्थेपर्यंत आणून ठेवले. परिणामी, काँग्रेस पक्षावर ही अवस्था ओढवली. कार्यकर्ते घडविण्यासाठी आम्ही स्वबळावर पर्यंत करतो. पण, मर्यादांवर मात करता आली नाही. सेवादलाला दुय्यम म्हणून राजकीय वाटचाल करणाºया काँग्रेसची अवस्था वाईट होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. त्यामुळे सेवादलाचे पूनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
गहुकार म्हणाले, सेवादलातून घडलेला कार्यकर्ता स्वाभिमानी आहे. आज संख्येने कमी असेल. पण, तो व्यवस्थेला शरण जात नाही. देश व सर्वसामान्यांप्रती निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या अल्प असली तरी या विचारांची बीजे परिवर्तनासाठी मोठी आहेत.
चष्मा व झाडू म्हणजे गांधी नव्हे!
काँग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. हर्डीकर यांच्या जीवनकार्यावर पीएचएडी मिळविणाºया प्रा. डॉ. ज्योती राखुंडे म्हणाल्या, भाजपाचे सरकार गांधीजींना केवळ स्वच्छतेचे प्रतिक म्हणून देशापुढे मांडत आहे. ही अत्यंत खुजी मानसिकता असून चष्मा व झाडू म्हणजे गांधीजी नव्हे! गांधीजींची विश्वव्यापी भूमिका झाकून टाकण्यासाठीच भाजपा व आरएसएसकडून बुद्धिभेद केला जात आहे. त्यामुळे गांधीजी नेमके कोण त्यांची विचारधारा काय, हे जनता व कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेसने याकडे लक्ष देण्याची हीच खरी वेळ आहे. सेवादलातून तयार झालेले कार्यकर्तेच काँग्रेसचे दिवस बदलू शकतात.
सेवादलाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. ना. सू. हर्डीकर
पद्मभूषण डॉ. ना. सू. हर्डीकर यांनी डिसेंबर १९२३ मध्ये हिंदुस्थानी सेवादलाची स्थापना केली. भारतातील हे त्यावेळचे एकमेक अखिल भारतीय स्वयंसेवक संघटन होते. सेवादलाच्या स्थापणेमुळे स्वातंत्र्य आंदोलनाला शिस्त लागली. नि:स्वार्थी, देशभक्त, तत्वज्ञानाच्या कसोटीतून निघालेले कार्यकर्ते निरोगी समाजाची पायभरणी करीत होते. कार्यकर्त्यांची पिढी सेवादलाच्या प्रशिक्षणातून तयार झाली. हिंदुस्थानी सेवादलाचे रुपांतरण काँग्रेस सेवादल झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाला येथून कार्यकर्त्यांची ताकद मिळत होती. आज काँग्रेस पक्षामध्ये कुणीही येतो. ना प्रशिक्षण आणि विचार. कोणत्या आधारावर प्रतिगामी विचारांवर मात करणार? मूल्यनिष्ठेशी सोयरसुतक नसलेल्या आजच्या कालखंडात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना सेवादलातूनच उभारी मिळेल, अशी भूमिका या चर्चेतून पुढे आली.
काँग्रेसला टिकायचे असेल तर....
राष्ट्रीय चारित्र्य, अनुशासन, एकात्मता आणि श्रमप्रतिष्ठा हे सेवादलाची चतु:सूत्री आहे. देशहित लक्षात घेवून कार्यकर्ते घडविण्याचे काम काँग्रेस सेवादल करते. ‘सेवादलाचे आम्ही स्वयंसेवक आहोत’ हे बरेचजण मान्य करतात. पण, काँग्रेसला टिकायचे असेल तर सेवादल सक्षम करावा, असे नेत्यांना वाटत नाही. परिणामी केव्हाही कोसळणाऱ्हा डोलाऱ्याप्रमाणे कार्यकर्ते तयार झाले. यातून कॉग्रेस कशी सक्षम होणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
‘ती’ घटना सुन्न करणारी!
चंद्रपुरातील महानगर पालिकेसमोर ध्वजारोहण करण्याची प्रेरणादायी परंपरा काँग्रेसच्या गटबाजीने धुळीस मिळाली. सेवादलाला काँग्रेसमधील कोणताही गट-तट मान्य नाही. पण, तहसीलदारांनी ध्वजारोहण केल्याचे पाहून आत्महत्या करावी काय, कोणते दिवस पाहात आहोत, ही वेदनाही यावेळी दलित मित्र देवराव दुधलकर यांनी मांडली.
‘ हा’ निर्णय काँग्रेसनेच घ्यावा
भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या नियंत्रणातच काँग्रेस सेवादल आहे. सेवादलाचे पुनरुज्जीवन करणे आणि नवे कार्यक्रम देण्यासोठी राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसनेच, पुढाकार घ्यावा, असा सूरही चर्चेत उमटला.