चंद्रपूर : शहरातील तुकूम प्रभागात हनुमाननगरातील शिवनेरी बाल उद्यानाचे नाव बदलविण्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न विचारल्याने दोन्ही गटांत वाद झाला. हा वाद वाढून त्यांचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
मनपाने काही वर्षांपूर्वी हनुमाननगरात शिवनेरी बाल उद्यान तयार केले आहे. हे उद्यान बालकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या उद्यानाला लागूनच सन २०१८-१९ अंतर्गत खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत २६ लाखांचा निधी खर्चून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळा बांधण्यात आली. उद्यान व व्यायामशाळेचे नामकरण करण्यासाठी मनपाने यापूर्वीच ठराव पारीत केला. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते बुधवारी या व्यायामशाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमादरम्यान, बाल उद्यानाचे शिवनेरी हे नाव बदलविण्यात येत असल्याच्या शंकेने काँग्रेसच्या काही युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रश्न उपस्थित केला. यातून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाली. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लगेच त्या युवकांना वास्तवाची जाणीव करून दिल्यानंतर वाद मिटला आणि वाद घालणारे कार्यकर्ते सभागृहाबाहेर गेले.
अहिर यांनी मैदानातील व्यायामशाळेचे नाव सावरकर असले तरी मैदानाचे नाव शिवनेरीच राहील असे स्पष्ट केले. लोकहित लक्षात ठेवूनच कार्यक्रम घेण्यात आला होता, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती संदीप आवारी यांनी दिली. शहरात मात्र, दिवसभर या कार्यक्रमाची चर्चा होती.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व्यायामशाळेचा उपयोग वॉर्डातील सर्व नागरिकांनी घ्यावा, या हेतूनेच व्यायामशाळा उभारण्यात आली. राष्ट्रीय विभूतींच्या कार्याचा गौरव व प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी चौक, शहीद बाबूराव शेडमाके शहीदस्थळ व बाबू पेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. व्यायामशाळा लोकार्पण सोहळ्यात कोणतेही राजकारण नाही. ज्या युवकांचे गैरसमज होते तेही दूर झाले. लोकांच्या आग्रहास्तव हा सोहळा घेण्यात आला.
-हंसराज अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री