चंद्रपूर : सिंदेवाही येथे गुरुवारी लग्न वऱ्हाडाच्या ट्रक अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. यावेळी रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या देवराव अटरगडे, यशवंत मेश्राम, मंजू कोरटनाके, पवन टिकरे, आलिशा उईके, निशा मेश्राम आदी जखमींना ‘काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल,’ असा धीर त्यांनी दिला.
मतदार संघात काल मोठा अपघात झाल्याने, सर्व कामे थांबवून जखमींना पाहण्यासाठी मुंबईहून तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अपघातातील जखमींची काळजी घेण्यात येत असून, जखमींवर आवश्यकतेनुसार ऑपरेशन व तातडीने उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून, अपघात थांबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता नीलेश तुमराम, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख ललित तामगाडगे, समन्वयक उमेश आडे सोबत होते.