जि.प. निधीचा गैरवापर : बांधकामात भ्रष्टाचारमाजरी : जिल्हा परिषदेच्या फंडातून नुकतेच माजरी (वस्ती) त. भद्रावती येथे नालीचे बांधकाम करण्यात आले होते. ग्रामपंचायत माजरीच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत हे काम करण्यात आले होते. मात्र दोन लाख रुपये किंमतीचे असलेले हे नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने उद्घाटनानंतर केवळ १० दिवसांत हे बांधकाम जमीनदोस्त झाल्याने बांधकामाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.जिल्हा परिषदेमार्फत आलेला हा निधी लोककल्याणाच्या ऐवजी भ्रष्टाचारी लोकांच्या खिशात कमिशनरूपी पोहचलेला असल्यामुळेच असे हे निकृष्ट काम केले गेले असल्याची चर्चा समस्त माजरीवासियांमध्ये सुरू आहे.या नालीबांधकाम भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती ग्रामपंचायत सदस्या श्रीमती संध्या पोडे, संजय कवाडे तसेच मारोतराव पंधरे या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे. (वार्ताहर)
माजरीतील नाली बांधकाम १० दिवसांत कोसळले
By admin | Published: June 29, 2016 1:13 AM