पळसगाव (पिपर्डा ) : सध्या कोरोनाचा काळ सुरू असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाययोजना म्हणून लाॅकडाऊन १ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. संचारबंदी लागलेली असून सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पुलाचे बांधकाम तेजीत सुरू आहे. या बांधकामासाठी शासनाने निर्धारित केलेले नियम मात्र पाळले जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले. संचारबंदी करताना अनेक निर्बंध लादण्यात आली. अति आवश्यक सेवांना फक्त सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली होती. नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेऊन घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले, जिल्हा प्रशासनही नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील बांधकामे मोठ्या जोमाने सुरू आहेत. या बांधकामस्थळी मजुरांसाठी सुरक्षा विषयक कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही.
कोरोनाचा विषयक नियम न पाळताच बांधकामे सुरू आहे. तसेच बहुतेक कामे ही कुठलीही काळजी न घेता कोरोनाचे नियम न पाळता सर्रास सुरू आहेत. या प्रकरणी बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित करून बांधकामस्थळी संबंधित अधिकारी यांनी भेट देऊन नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी कामे होतील, याचे नियोजन करून चौकशी करण्याची मागणी ग्रामीण परिसरातील जनतेकडून केली जात आहे.