प्रकाश काळे।आॅनलाईन लोकमतगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यामुळे संबधित कंत्राटदाराने काम सोडून दिले. या बंधारा बांधकामाला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेकदा शेतकरी व गोवरीवासीयांनी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गोवरीचा बंधारा आता अखेरच्या घटका मोजत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे वेकोलिच्या कुशीत वसलेले चार हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलित पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी पूर्णत: खोल गेलेली आहे. बंधाºयामुळे पाण्याची पातळी वाढेल आणि गावकºयांना व परिसरातील शेतकºयांना सिंचनाचा लाभ घेता येईल, या हेतूने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू केले.परंतु बंधाºयाचे काम उशिरा सुरू झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. संबंधित कंत्राटदाराला काम करणे परवडत नसल्याने त्याने अर्ध्यावरच काम सोडून दिले. वाढीव निधीअभावी बंधाºयाचे काम अडल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे. बंधाऱ्याला वाढीव निधी मिळावा, यासाठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आमदार अॅड. संजय धोटे यांच्याकडे पाठपुरावा केला. बंधाऱ्याचे काम गेल्या दहा-बारा वर्षांपासून अपूर्ण असल्याने शासनाने बंधारा बांधकामावर लाखो रुपये खर्चूनही या बंधाऱ्याचा उपयोग कुणालाही झाला नाही.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा शासनाचा नियम आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी शासन जनजागृती करते. मात्र शासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही, हे दुदैव आहे.त्यामुळे या बंधाºयाचे तातडीने बांधकाम करावे, अशी मागणी गोवरी येथील गणपत लांडे, भाऊराव रणदिवे, शंकर लांडे, मारोती लांडे, भास्कर लोहे, अमित रणदिवे, सुमित रणदिवे, प्रमोद लांडे, श्रीधर जुनघरी, भास्कर जुनघरी, प्रभाकर जुनघरी, निखील लांडे यांनी केली आहे.तीन आमदार बदलले, बंधारा अपूर्णचबंधारा बांधकाम सुरू झाल्यापासून राजुरा विधानसभा क्षेत्राचे तब्बल तीन आमदार बदलले. मात्र हा बंधारा तसाच खितपत अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन बंधारा बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी गोवरीवासीयांनी केली आहे.शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधला. मात्र नियोजनाअभावी बंधारा बांधकाम रखडले. बंधाºयाचे काम पूर्ण करावे, यासाठी संबधितांकडे चकरा मारल्या. पण बंधारा अजूनही पूर्ण झाला नाही.- नागोबा पाटील लांडे,अध्यक्ष, बंधारा समिती, गोवरी
निधीअभावी रखडले बंधाऱ्याचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:38 AM
राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला.
ठळक मुद्देबजेट वाढल्याने कंत्राटदार पसार : शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले