चंद्रपूर : शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळांनी महापौरांना दिलेल्या निवेदनातून केली.
चंद्रपुरातील अंत्यत रहदारीच्या अशा महाकाली कॉलरी परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने अपघाताची शक्यता आहे. या मार्गावर पाइपलाइनचे खोदकाम केल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहते. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे काम त्वरित करावे. बागला चौक ते महाकाली काॅलरी, रय्यतवारी कॉलरी बीएमटी चौक ते मानवेंद्र बायपास रोडचे काम लवकर सुरू करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, महिला सेना जिल्हा सचिव अर्चना आमटे, तालुका उपाध्यक्ष क्रिष्णा गुप्ता, तालुका उपाध्यक्ष मनविसे प्रवीण शेवते, शैलेश सदालावार आदी उपस्थित होते.