दुर्गापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने भटाळी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील इरई नदीच्या रपट्यालगत सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले. ते पावसाळ्याआधीच उखडले असून तेथे खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. या बांधकामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, तसेच या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यात इरई धरण तुडुंब भरल्यानंतर त्यातून वेळोवेळी पाणी सोडण्यात येते. यामुळे भटाळी गावाकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद होत असे. याचा येथील नागरिकांना व भटाळी खुल्या कोळसा खाणीतील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तो होऊ नये, यासाठी वेकोलिने इरई नदीवर रपट्याचे बांधकाम केले. रपट्यानंतर डांबरीरोड होता तो नदीवरून जाणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने उखडून तिथे मोठमोठाले खड्डे पडत होते. नदीवरील पाणी उतरूनही अशा पडलेल्या खड्यामुळे या रपट्यावरून नागरिकांना ये-जा करता येत नव्हते. या त्रासामुळे नागरिक कंटाळले होते. त्यामुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने गतवर्षी सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले. याशिवाय याच मार्गावर काही अंतरावर एक छोटा रपटाही बांधला.नागरिकांच्या सोयी सुविधेकरिता करण्यात आलेले बांधकाम पावसाळ्याआधीच उखडून तेथे खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे यंदाही नागरिकांची गैरसोय होणार आहे. सदर कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने संबंधीत कंत्राटदाराने याचा गैरफायदाा घेत ते निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. पाावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहे. यातच हे बांधकाम उखडत आहे. परत येथील नागरिकांना जुनीच चिंता भेडसावत आहे. विशेष म्हणजे या नदीवर भटाळी गावासह इतर कित्येक लोक येथून वाहून गेले आहेत.सदर बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधीत कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. येथे तातडीने बांधकाम करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
इरई नदीजवळील रपट्यालगतच्या रस्त्याचे बांधकाम उखडले
By admin | Published: May 25, 2015 1:32 AM