छायाचित्र
सिंदेवाही : पावसाळा सुरू झाला असून नदी नाल्यांना पाणी येऊ लागले आहे. विहिरी, नद्या, नाल्यांना आलेले पाणी दूषित असून ग्रामीण भागात या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शासकीय यंत्रणा दिवस-रात्र कर्तव्य प्रामाणिकपणे करीत आहे. परंतु ग्रामीण भागात ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाही. अशा अनेक तक्रारी पंचायत समितीच्या सभागृहात दरवर्षी आढावा सभेमध्ये गाजल्या जाते. पण यावर काहीच उपाय होत नाही. विहिरीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे, क्लोरिनेशन करणे, हातपंपाजवळ जागेची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. परंतु याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी साथीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याचा पुरवठा जिथून केला जातो, त्याच्या जवळपास मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असते. आजूबाजूला साचलेली घाण पाणी अशुद्ध होण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र पाण्याच्या टाकीची साफसफाई बरोबर होत नसल्याने त्याच्यात जंतू असल्याचे दिसते. संबंधित विभागाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.