चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील १३० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अनेक मोठ्या कंपन्याची कामे चालतात. यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. अशा कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार पगार आणि सुविधा मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना सुरक्षेसाठीचे सर्व साधने उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा या कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले जाते. मागणी केली असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. यासाठी कामगार संघटना असतात. मात्र, अनेकदा या संघटनांकडून देखील भ्रमनिरास होतो. त्यामुळेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील १३० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी संघटनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हा कार्ययाध्यक्ष कैलाश तेलतुंबडे, जिल्हा सचिव अमोल मेश्राम, शहर उपाध्यक्ष महेंद्र ठाकूर
, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची जबाबदारी असणारे अध्यक्ष प्रफुल सागोरे, युनिट सचिव प्रमोद कोलारकर, युनिट संघटक अमोल भट, पंकज इंगोले, महेश हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.