चंद्रपूर : क्रिकेट खेळत असताना अल्पवयीन मुलांत वाद झाला. रागाच्या भरात एका मुलाने बॅटने दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर जोरदार वार केला. परिसरातील नागरिकांनी लगेच त्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दोन दिवसांनंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत मुलाच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फैजान अखिल शेख (१२, रा. बगडखिडकी) असे मृत मुलाचे नाव आहे.
३ जून रोजी चंद्रपूर बगडखिडकी परिसरातील मस्जिदशेजारील मैदानावर १० ते १५ वर्षांखालील मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळत असताना त्या मुलांमध्ये वाद झाला. यावेळी एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात फैजान शेखच्या डोक्यावर बॅटने जोरदार वार केला. परिसरातील नागरिकांनी त्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, ५ जून रोजी फैजानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसांना कुणकुण लागली होती. त्यातच मृत मुलाच्या आईने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी मंगळवारी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल स्थुल करीत आहेत.
शवविच्छेदनासाठी दफन केलेला मृतदेह काढला
उपचारादरम्यान ५ जून रोजी फैजानचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार न करता त्याच्या पार्थिवावर दफनविधी केला. मंगळवारी फैजानच्या आईने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार केली. मात्र मृतदेह दफन केला असल्याने पोलिसांनी परवानगी घेऊन दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले.