आठवडी बाजाराचा अनेकांना फटका
चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे या बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही घटले आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
बेरोजगारांना सतावतेय चिंता
चंद्रपूर : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळेल या आशेने जिल्ह्यातील बेरोजगार स्पर्धा परीक्षेकडे वळले. मात्र, कोरोनामुळे सर्वच बंद आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षा होतील की, नाही या चिंतेत सध्या ते पडले आहेत. दोन ते चार वर्षांपासून अभ्यास करूनही अद्यापही नोकरी न मिळाल्याने भविष्यात कसे जगायचे हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे.
वीज वितरण कर्मचाऱ्यांना त्रास
चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज गुल होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. परिणामी घरांमध्ये विजेचा वापर वाढला आहे. वीज गेल्यास महावितरणला फोनद्वारे माहिती देत दुरुस्तीची मागणी करीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ येऊन दुरुस्ती करावी लागल आहे.
ग्रामीण भागात पाणी टंचाई
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: डोंगरांवरील गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर काही गावांतील नळ योजना बंद असल्याने त्या गावातील नागरिकांनाही पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.
नदीपात्रात गर्दी वाढतेय
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीपात्रामध्ये सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे याकडे ग्राम प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
जनावरांचेही सुरू आहेत हाल
जिवती : यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतून चारा आणता आला नसल्याने जनावरांचे चाऱ्याअभावी हाल होत आहेत. कसेबसे करून शेतकरी त्यांची सोय भागवत आहे. मात्र, आणखी अशीच काही दिवस परिस्थिती राहिल्यास मोठे संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महसूल कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा
चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर महसूल तसेच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे.
कृउबा समिती परिसरात गर्दी वाढली
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे या गर्दीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. काही ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे. यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.