चंद्रपूर : चंद्रपूरसह राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)मध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांची कामे सोस चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिनस्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार आहे.
तर राजुरा हे सीमा तपासणी नाका राहणार आहे. चंद्रपुरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. ते नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित येत होते; परंतु, जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात दुचाकी, चारचाकीसह इतरही वाहनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने २३ जून रोजी काढलेल्या अध्यादेशात राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाचा दर्जा वाढवण्यात आला आहे.
यामध्ये पिंपरी- चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), अकोला, बोरीवली (मुंबई), सातारा यासह चंद्रपूरचाही समावेश आहे. त्यामुळे आता चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रूपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना सोईचे झाले असून त्यांना नागपूरला जाण्याचा त्रास कमी झाला आहे.66 पदांचा आकृतीबंध मंजूर
चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात पूर्वी 40 पदाचा आकृतीबंध होता. मात्र, आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर झाल्याने नव्याने 66 पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक आदी पदांचा समावेश आहे.
चंद्रपूरसह राज्यातील नऊ ठिकाणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नऊ प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर झाले आहे. अपील प्राधिकरण चंद्रपूर येथे झाल्याने वाहनचालकांना नागपूरला जाण्याचा त्रास वाचला आहे. नव्या आकृतीबंधानुसार पदे भरण्यास मंजुरी मिळाल्याने आता येथील कर्मचारी वाढून नागरिकांना त्वरित सेवा मिळणार आहे.
- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर