गोंडपिपरी : येथील सॅन्जी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आर्थिक अडचणीपोटी शैक्षणिक शुल्क न भरल्याने त्यांच्या पाल्यांना धडा शिकविण्यासाठी कॉन्व्हेंट व्यवस्थापनाने सुडबुद्धीने प्रथम सत्र परीक्षेदरम्यान अर्धवेळ परीक्षेपासून वंचित ठेवले. या प्रकाराने पालक वर्गामध्ये कमालिची नाराजी पसरली आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या एका पालकाला व्यवस्थापनाने भेटण्यासही नकार दिल्याने कॉन्व्हेंट व्यवस्थापनाच्या अडेलतट्टू धोरणाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित पालकांनी केली आहे. शहरात शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत सॅन्जी कॉन्व्हेंट स्कूल हे नाव प्रचलित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सदर कॉन्व्हेंट कार्यान्वित असल्याने अनेक पालकांकडून पाल्यांच्या शिक्षणासाठी येथे पसंती दर्शविली जाते. खासगी व्यवस्थापनाअंतर्गत सुरू असलेल्या सॅन्जी कॉन्व्हेंट स्कूलचे शिक्षण महागडे असल्याने आर्थिक अडचणीपोटी बहुतांश पालकांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड जाते. अशीच आर्थिक अडचण येथे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांना भासल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शैक्षणिक शुल्काचा भरणा केला नाही. यावर कॉन्व्हेंट व्यवस्थापनाने कठोर भूमिका घेत पालकांची आर्थिक अडचण जाणून न घेता चक्क विद्यार्थ्यांवर सुड उगविला. सुरू असलेल्या प्रथम सत्र परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीमध्ये अर्धवेळ बाहेर ठेवून त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार घडल्याचे काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे तक्रार केली.यावरून पालकांमध्ये संतापाची लाट ओसरून त्यापैकी एका पालकाने व्यवस्थापनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या पालकास धूडकावून लावत भेटण्याचेही संधी दिली नसल्याचे संबंधित पालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विद्यादानाचे पवित्र कार्य चालविणाऱ्या संस्थांकडून विद्यार्थ्याला करण्यात येणारा छळ व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाचा कळस गाठण्याइतपत असून अशा अडेलतट्टू धोरणाचा पालकांनी निषेध नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा कॉन्व्हेंट व्यवस्थापनाकडून छळ
By admin | Published: September 19, 2015 1:12 AM