चंद्रपूर : जुलै महिना सुरू होऊनही उकाडा कमी झाला नसल्याने पुन्हा तापमानात वाढ होत असून घरांमध्ये पंखे, कूलरची घरघर पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस कोसळला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाने हुलकावणी दिली.
यावर्षी मृगात अगदी वेळेवर पाऊस कोसळला. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व इतर पिकांची पेरणीही शेतकऱ्यांनी केली. दमदार पावसानंतर आता उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यात तर सूर्याचे दर्शन होऊन पुन्हा वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. वातावरण बदलाचा परिणाम आजारावरसुद्धा पडत आहे. त्यामुळेच मानवासोबत पशूप्राणी यांनाही आजाराचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शासकीय, निमशासकीय, तसेच घराघरातील कूलर दिवस-रात्र सुरूच असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.