कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. बाधिताच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना होऊ नये, यासंदर्भातही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आरोग्याची काळजी घेऊन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आली. चंद्रपुरात महानगर पालिकेचे कर्मचारी हे कार्य करीत आहेत. रक्ताच्या नात्यांनी नाकारले तरी मृतदेहाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करीत आहेत, अशी माहिती पथकातील एका कर्मचाऱ्याने दिली.
पाच व्यक्तींना परवानगी पण मृतांच्या नशिबी तेही नाही
कोरोना बाधित मृताच्या अंत्यसंस्कारासाठी पीपीई किट घालून पाच व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. परंतु, काही कुटुंब आपले रक्ताचे नातेही पाळत नाही. ‘तुम्हीच अंत्यसंस्कार करा, आम्ही येऊ शकत नाही’ असे म्हणून प्रतिसाद देत नाही. चंद्रपूर शहरात मार्च महिन्यात अशा घटना घडल्या आहेत. शासनाने परवानगी देऊनही मृतांच्या नशिबी तेही येत नाही. त्यामुळे महानगर पालिकेचे कर्मचारी जणू देवदूत म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
सरपंच, पोलीस पाटलांचा मोठेपणा
ग्रामीण भागातही कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करीत नसल्याचे चित्र आहे. कोरोनापूर्वी अंत्यसंस्कार म्हटले की पुण्याचे काम म्हणून नागरिक मदतीला धावून यायचे. कोरोनामुळे माणुसकी आटली. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये सरपंच व पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी पुढे येत आहेत.
कोट
मृताच्या नातेवाईकांनी घाबरू नये. पीपीई किट घालून आपल्या स्नेहीजनाला शेवटचा निरोप देता येतो. खबरदारी घेऊन आपल्या धार्मिक प्रथा, परंपराही पाळता येतात. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.
-एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर
मृतदेहापासून दूर उभे राहून दर्शन घेता येते. आम्ही अशा कुटुंबांना मनाई करीत नाही. मात्र, नियमांचे पालन केले पाहिजे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू वेदनादायीच आहे. पण, गैरसमजापासून दूर राहून अखेरचा निरोप दिला पाहिजे.
एक कर्मचारी मनपा, चंद्रपूर