राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावी परिक्षांचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले. आता दोन महिन्यांचा कालावधी झाला असताना नागपूर विभागीय मंडळाने दहावी, बारावीच्या पुरवणी परिक्षेबाबत कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नसल्याने राज्यातील सुमारे २२ हजार ८३५ विद्यार्थ्यांना पुरवणी परिक्षेची प्रतीक्षा लागत आहे.
राज्य मंडळाकडून दरवर्षी दहावी, बारावी फेरपरीक्षांचे नियोजन जुलै महिन्यात होते. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या परिक्षांचे निकालच जुलै महिन्यात जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळातंर्गत दहावी परीक्षेसाठी मंडळातील १ लाख ६२ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ६१ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक लाख ५१ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नऊ हजार ९४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावी परीक्षेसाठी एक लाख ५५ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ५४ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामधून एक लाख ४१ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण तर १२ हजार ८९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
पुरवणी परिक्षेसाठी दहावी, बारावीचे एकूण २२ हजार ८३५ विद्यार्थी राज्य मंडळाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. सप्टेंबर महिना संपत आला असला तरी दहावी, बारावी फेरपरीक्षांचे ऑनलाईन अर्ज, परिक्षेचे स्वरूप, वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना अजूनही प्राप्त झालेल्या नाहीत. पुरवणी परिक्षांचा निर्णय राज्यस्तरावर होणार असल्याने शिक्षक, विद्यार्थीसुद्धा संभ्रमात आहेत.मागील वर्षी २२ हजार ८३५ विद्यार्थी अनुत्तीर्णनागपूर विभागीय मंडळात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. दहावी, बारावीचे २२ हजार ८३५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये दहावीचे भंडारा जिल्ह्यातील ९८२, चंद्रपूर दोन हजार २५७, नागपूर तीन हजार २८१, वर्धा एक हजार ३२३, गोंदिया ९८२, गडचिरोली एक हजार ११९ तर बारावीचे भंडारा एक हजार १०७,चंद्रपूर २ हजार ६५७,नागपूर ४ हजार ४८२, वर्धा दोन हजार ०४४, गोंदिया एक हजार १७३, आणि गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार ४२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दहावी, बारावी पुरवणी परिक्षेसंदर्भात राज्य मंडळाकडून सूचना प्राप्त झाल्या नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अर्ज, वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना राज्य मंडळाकडून मिळताच नागपूर विभागीय मंडळअंतर्गत असलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे नियोजन केले जाईल- पुनम मस्केशिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि. प. चंद्रपूर