चंद्रपूर : कोरोना संकट आले आणि अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यामध्ये काही बालकांच्या डोक्यावरील छत्रही हरविले असून ते आता आई-वडिलाविना पोरके झाले आहेत. जिल्ह्यात अशा बालकांचा जिल्हा प्रशासनाद्वारे शोध घेतला जात आहे. यामध्ये काही बालकांचा शोध लागला असून त्यांची काळजी प्रशासन घेणार आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचे आईवडील दगावले. आता त्यांच्या पालनपोषणासह शिक्षण आणि आरोग्याचाही प्रश्न उभा ठाकला आहे. अशा निराधार काही मुलांचा नातेवाईकांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी मुलांना दत्तक द्यायचे आहे, अशा प्रकारचे फेक मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला अशा बालकांचा शोध घेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने या बालकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाकडे ८ ते १० बालकांची नावे आली असल्याची माहिती मिळाली आहे.
बॅाक्स
या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?
ज्या मुलांचे आई-वडील कोरोनामुळे दगावले आहे. अशा मुलांचे गावपातळीवर प्रशासन शोध घेत आहेत. यातील काहींचा शोध लागला आहे. शोध घेतल्यानंतर त्यांची परिस्थिती जाणून घेणार आहे. त्यांच्या कुटुंबातील कुणी त्यांचा सांभाळ करण्यास सक्षम आहे का, हे सुद्धा पडताळून बघणार आहे. ते सक्षम नसल्यास त्यांना शिशूगृहात तसेच अनुरक्षणगृहात ठेवण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रकिया बालकल्याण समिती मार्फत करण्यात येणार आहे. पालकांच्या संपत्तीमधील बालकांचा वाटा या अनुषंगानेही तपासणी करण्यात येणार आहे.
बाॅक्स
दरमहा १ हजार १०० रुपयांची मदत
कोरोनामुळे आई-वडील दोघांचेही किंवा दोघांपैकी एकाचे
निधन झाले असेल, अशा बालकांचा शोध घेऊन त्यांच्या अडचणीनुसार त्यांना दरमहा १ हजार १०० रुपये अनुदान बाल संगोपन योजनेंतर्गत मदत केली जाणार आहे. यासाठी हयात असलेल्या पालकाने काही कागदपत्र बाल कल्याण समितीकडे देणे आवश्यक आहे. मृत पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, मुलाचा रहिवासी दाखला, छायाचित्र, आधार कार्ड व तहसीलदारांचे प्रमाणपत्र समितीकडे द्यावे लागणार आहे. सोबतच बॅंक खात्याचा क्रमांकही द्यावा लागणार आहे.
कोट
कोरोनामुळे आई-वडील दोघेही किंवा दोघांपैकी एक गमावलेल्या मुलांचे शोध घेणे सुरु आहे.यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणांद्वारे माहिती गोळा करणे सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत काही बालकांची माहिती मिळाली असून त्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे.
-अजय साखरकर
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर
---
बाॅक्स
माहिती द्यावी
या बालकांचे नुकसान होऊ नये, ते शोषणास तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीमध्ये बळी पडू नये यासाठी समाजातील जागृत नागरिकांनीही प्रशासनाला माहिती कळविणे गरजेचे आहे. यासाठी १०९८ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करून माहिती देता येते.