बल्लारपूर : कोरोनाचा वेग दिवाळीपासून ओसरू लागल्यानंतर इतर व्यवहाराप्रमाणे कला व क्रीडा क्षेत्रही परत कामाला लागले. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन होऊन त्यात खेळाडू व कलाप्रेमी भाग घेऊन आनंद लुटू लागले होते. मात्र, परत मार्चमध्ये कोरोनाने डोके वर केले. त्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय याअंतर्गत कला व क्रीडा यांना खीळ बसली आहे.
भोजन, नित्याची कामे यासोबतच मनाला विरंगुळा म्हणून वा कलागुणांना वाव मिळावा, यासाठी गायन, नृत्य, अभिनय इत्यादी कला तसेच विविध मैदानी वा दार बंद खेळांमध्ये रसिक भाग घेतात व त्यात रमतात. यावर बरेचसे कलाकार व खेळाडू पोसले जातात. राज्याची व देशाची त्या त्या प्रमाणे ओळख होते. जम बसतो. त्यामुळे कला व क्रीडा याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात चित्रपट व नाटक हेही ओघाने आलेच. शाळा, महाविद्यालयातही कला व क्रीडा बहरून पुढे त्यातून मोठाले प्रतिभावंत खेळाडू, कलाकार उदयाला येतात. यामुळे या दोन्ही प्रांतांना शिक्षण क्षेत्रात महत्त्व आहे. कोरोनामुळे कला व क्रीडा या क्षेत्राला खीळ बसली होती. शाळाच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्या आनंदापासून मुकावे लागले. कोरोना गेल्यानंतर परत सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा होऊ लागल्या. चित्रपटगृहही सुरू झाले. आणि नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या बेतातच परत कोरोनाने पूर्वस्थिती आणून ठेवली आहे. यामुळे, कला-क्रीडा चित्रपट क्षेत्र परत ठप्प झाले आहे. यामुळे रसिक, क्रीडाप्रेमी यांची मने हिरमुसली. सोबतच या क्षेत्राशी संबंधित कर्मचारी, व्यावसायिक यांच्यापुढेही रोजीरोटीचा प्रश्न उभा झाला आहे.