लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे घराबाहेर निघणे आता कठीण झाले आहे. त्यातच ज्येष्ठांना तर बाहेर निघण्यावर निर्बंध आहे. त्यामुळे घरात राहून आता ज्येष्ठ नागरिक कंटाळले असून आम्हालाही बाहेर निघू द्या, अशी मागणी ते करीत आहे. बाहेर निघाले तर कोरोनाचे संकट आणि घरात राहिले तर कुटुंबांना त्रास अशा पेचात ते पडले आहेत.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांना घरात बंदिस्त व्हावे लागले. कोरोनासोबतच जगायची मानसिकता ठेवून विद्यार्थ्यांसह नोकरदार आपापल्या कामाला लागले आहेत. लहान मुलांची शाळा बंद असली तरी आॅनलाइन अभ्यास सुरू आहे. अपवाद केवळ जेष्ठ नागरिकांचा आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहे. बाहेर निघाल्यास कोरोनाची भिती आहे. त्यामुळे इच्छा असली तरी कुठेच जाता येत नाही. कोरोनापूर्वी मैदान, बाग, ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्रात सगळे एकत्र जमायचे, मोकळ्या वातावरणात गप्पा मारायचे त्यामुळे मन मोकळे व्हायचे. एकमेकांची आस्थेने विचारपूस, सुखदुख वाटून घेत होते. शरीराबरोबर मानसिक स्वास्थ्यही जपले जायचे. आता सगळेच बंद झाले. वाचन, लेखन, आवडीचे छंद यासारख्या गोष्टीही वारंवार करून कंटाळाला आला आहे. काही कुटुंबामध्ये ज्येष्ठांची काळजी घेतली जात असली तरी काहींमध्ये भांडनतंटेही होत आहे. अनेकांना बाहेर पडायचे आहे. मात्र भितीमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. केवळ रुग्णालयात जाण्यासाठीच ते बाहेर पडत आहे. मात्र यावेळीही त्यांच्या मनात कोरोनाची तपासणी करणार काय, अशी भिती आहे.
अँड्रॉइड मोबाईलचा वापर वाढलालॉकडाऊननंतर घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आल्यानंतर काही ज्येष्ठांनी अँड्रॉइड मोबाईल वापरण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र किती वेळ मोबाईल वापरायला यालाही बंधन आहे. त्यातच काहींच्या नातवांकडूनही मोबाईलची मागणी होत आहे. त्यामुळे मुकाट्याने नातला, मुलाला मोबाईल द्यावा लागत असल्याचेही ज्येष्ठांनी सांगितले.
टीव्हीवरही एकच विषयटीव्ही हे विरंगुळ्याचे चांगले साधन आहे. मात्र मागील काही दिवसापासून टिव्हीवरही एकच एक कार्यक्रम दाखविले जात आहे. त्यामुळे टीव्ही बघणे सुद्धा आता ज्येष्ठांना कंटाळवाणे झाले आहे. काही वेळा अवास्तव अॅक्शन, डबींग असलेले हे चित्रपट दाखविले जात आहे. अतिशयोक्ती करणाऱ्या मालिक दाखविल्या जात असल्याने ते सुद्धा बघण्याचा कंटाळा ज्येष्ठांना आला आहे. त्यातच घरातील प्रत्येक जण कामात असल्याने वेळ घालवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
ज्येष्ठांनी योग, प्राणायाम करून घरातच दररोज १५ ते २० मिनीट चालावे. फळ पालेभाज्या खाण्यावर भर द्यावा. ८ ते ९ तास झोप घ्यावी. गरम पाणी प्यावे, ध्यान करावे.- विजय चंदावार, अध्यक्ष फेसकम वनवैभव,चंद्रपूर
या काळात सर्वांवरच संकट कोसळले आहे. त्यामुळे ज्या गाईडलाईन ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार घरात राहणेच गरजेचे आहे. ज्येष्ठांना कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी घराबाहेर निघू नये.-विश्वासराव जोगी, सेवानिवृत्त कर्मचारी, घुटकाळा वॉर्ड चंद्रपूर