फोटो
चंद्रपूर : देशभरात कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले. घरातील कर्ता माणूसच कोरोनामुळे मृत्यू पावल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोनामुळे प्रमुख व्यक्ती गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथील विठ्ठल-रुक्माई सभागृहात सांत्वनपर भेट घेऊन गरजू कुटुंबांना आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, नगराध्यक्षा रिता उराडे, प्रमोद चिमुरकर, विलास निखार, ज्ञानेश्वर कायरकर, तहसीलदार विजय पवार उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले कोरोना आजाराने अनेकांचे मृत्यू झाले. यातच घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटुंब उघड्यावर पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी मिळणारी मदत ही अपुरीच आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील जवळपास १७५ मृत्यू कोरोनामुळे झाले आहे. सुरुवातीच्या काळात तालुक्यात दहासुद्धा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नव्हते. मात्र शासन आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आजमितीला तालुक्यात ११० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. या महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडल्या तरी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न झालेत. त्यामुळे नागरिकांनासुद्धा दिलासा मिळाला. कोरोनाचा धोका अजूनही संपला नसून नागरिकांनी येणाऱ्या तिसऱ्या लाटेसंदर्भात काळजी घ्यावी, तसेच उत्तम आरोग्य बाळगण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थितांना दिल्या.