मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे मुले दिवसभर घरीच राहत आहेत. त्यातच कोरोनाच्या दहशतीने पालक मुलांना घराबाहेर खेळण्यासाठीसुद्धा सोडत नाहीत. त्यातच घराबाहेर पडू नको म्हणून मुलांना विविध खाण्याचे आमिष दाखवितात. त्यामुळे मुले वेळी-अवेळी वाटेल ते खाऊन घरीच राहतात. दिवसभर एकाच जागी बसून टीव्ही पाहणे, आदींमुळे मुलांच्या शरीराची हालचाल होत नाही. परिणामी त्यांचे वजन वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे सर्वांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याचाच परिणामी मुलांवर पडत आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून आपल्या पाल्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून होत आहे.
बॉक्स
वजन वाढले कारण...
कोरोनामुळे घराबाहेर पडणे बंद आहे. मैदानी खेळांचा मुलांना विसर पडत आहे. दिवसभर टीव्हीसमोर बसून खाणे सुरू आहे. शाळा बंद असल्याने जीवनशैलीत बदल झाला आहे. वेळी-अवेळी उठणे सुरू झाले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
बॉक्स
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
सकाळी लवकर उठावे, रात्री वेळेवर झोपणे गरजेचे आहे. जास्त वेळ जागरण करू नये, किमान अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. वेळी-अवेळी खाणे टाळावे, मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे. सतत एका ठिकाणी बसून टीव्ही पाहणे टाळावे. जास्त तेलकट व बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. मुलांच्या वाचन, लेखन याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
मुले टीव्ही, मोबाईल सोडतच नाहीत
माझ्या दोन्ही मुलींना कार्टून बघायला आवडते. जोपर्यंत मोबाईलवर किंवा टीव्हीवर कार्टून लावत नाही, तोपर्यंत जेवण करणार नाही, अशी धमकीच मुलींकडून मिळते. त्यामुळे नाइलाजाने टीव्ही लावून द्यावा लागतो.
रक्षा मेश्राम, बल्लारपूर
------
सुरुवातीला कोरोनाचा रुग्ण आढळताच मुलांना मोबाईल किंवा टीव्ही बघ; पण घराबाहेर जाऊ नको, असे आम्हीच सांगितले. आता त्याला त्याची सवयच जडली आहे. त्याला जर मोबाईल किंवा टीव्ही बघू दिले नाही, तर तो रडत असतो. काहीही ऐकत नाही. जिद्द करतो.
संजना गेडाम, चंद्रपूर
------
कोट
कोरोनामुळे जीवनशैलीत बदल झाला आहे. लहान मुलांवरही याचा परिणाम दिसून पडतो. यात काही मुलांचे वजन वाढले आहे, तर काही मुलांचे कमी झाले आहे. लॉकडाऊनमुळे आई-वडील घरीच राहल्याने मुलांना वेळी-अवेळी खाऊ घालतात. परंतु, त्यामानाने त्यांच्या शरीराचा व्यायाम होत नाही. झोपणे, उठणे यांच्या वेळेत फार बदल झाला आहे. परंतु, मुलांनी किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. विशिष्ट वेळेतच टीव्ही, मोबाईल बघावा. मुलांचे वाचन, लेखन याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर