चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रातही लॉग इन करूनच शाळेत हजेरी नोंदवावे लागणार अशी स्थिती आहे. गतवर्षी मुलांनी शिक्षणाचे ऑनलाईन धडे घेतले. ही शैक्षणिक पद्धती परिपूर्ण नाही. मात्र शाळांनी पालकांकडून १०० टक्के फी घेतली. यंदाही हाच प्रकार घडणार असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे तर दुसरीकडे शाळा चालविण्यासाठी खर्च लागतो, असा दावा खासगी शिक्षण संस्थाचालक करीत आहेत.
कोरोना संसर्गाचे सर्वाधिक अनिष्ट परिणाम शिक्षण व रोजगारावर झाले आहेत. मुलांचे भविष्य करपून जाऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना आत्मसात करा, असे आवाहन सरकार, शिक्षणतज्ज्ञ व खासगी शिक्षण संस्था करीत आहेत. जिल्ह्यातील एक-दोन खासगी संस्थांचा अपवाद वगळून गतवर्षी ऑनलाईन शिक्षण दिल्यानंतर पालकांकडून १०० टक्के फी वसुली करण्यात आली होती. २०२०-२१ मध्ये मुलांना डिजिटल ऑनलाईन शिक्षण देण्याचा पहिला वर्षे होता. त्यामुळे पालकांनी १०० टक्के फी भरली. मात्र, बऱ्याच मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या नाही. काही मुले तर होते तिथेच आहेत. ऑनलाईन शिक्षणातील अडचणी वर्षे संपूनही जैसे थे होत्या, असे पालकांचे म्हणणे आहे. मुले त्या शाळेत शिकतात उगाच कशाला वाद असा गोड समजून करून तक्रारीही करीत नाही, हेही वास्तव आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रात १०० टक्के फी भरतीलच याची शाश्वती नाही असे चित्र तर दुसरीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी घरच्या घरी दिलेले ऑनलाईन शिक्षण फायदेशीर ठरले. शिक्षकांना वेतन देण्यापासून अन्य शिक्षणपूरक बऱ्याच बाबींसाठी आर्थिक खर्च झाला. ऑनलाईन शिक्षणाचा उत्तम परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला, असा दावा शिक्षण संस्थांकडून केला जात आहे.
कोट
१०० टक्के फी कशासाठी?
ऑनलाईन शिक्षणाची पद्धत चांगली आहे. पण ही कायमस्वरूपी व्यवस्था होऊ शकत नाही. मुलांचा शिक्षकांशी पुरेसा संवाद नसतो. वारंवार नेटवर्क व तांत्रिक अडचणी निर्माण होतात. शिक्षक, काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व तांत्रिक खर्च वगळल्यास शिक्षण संस्थेला मोठा खर्च येत नाही. त्यामुळे सरसकट १०० टक्के फी घेणे न्यायोचित नाही.
-विवेक बुरडकर, बालाजी वार्ड चंद्रपूर
ऑफलाईन कोर्स जशाच तसा ऑनलाईन पद्धतीने कसा काय वर्गात शिकविणार, हा मूलभूत प्रश्न आहे. गतवर्षी पालकांसाठी हा अनुभव नवीन होता. मुले कितपत ज्ञान आत्मसात करू शकतात, याचा अंदाज नव्हता. मात्र मुलांच्या बेसिक समस्या सुटल्या नाही हे वास्तव आहे. नवीन सत्रात काही बदल होईल, असे वाटत होते. पण चक्क जुन्याच पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे १०० टक्के फी भरण्याची पालकांची मानसिकता नाही.
-सदानंद आत्राम, सिव्हिल लाईन, चंद्रपूर
कोट
शाळा ऑनलाईन असली तरी खर्च येतोच
मुलांच्या फीमधूनच शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. शाळा बंद असल्याने कामाचे तास कमी झाले. मात्र खर्च कमी झाला नाही. वाहनांचे मेंटनन्स, चालकांचे वेतन, वीज बिल व शासनाचा विविध कर भरावा लागतो. शासनाकडून अनुदान मिळत नाही. खासगी इंग्रजी शाळा पूर्णत: मुलांच्या फीवरच निर्भर आहेत. शाळा ऑनलाईन असली तरी खर्च येतोच. त्यामुळे पालकांनी शिक्षण संस्थांचीही अडचणी समजून घ्यावी.
-स्मिता जीवतोडे, अध्यक्ष चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर
बॉक्स
इंग्रजी शाळांनी ब्रिज कोर्स शिकावा
जिल्ह्यातील विनाअनुदानित बऱ्याच इंग्रजी शाळांची ऑनलाईन शिकवणी सुरू झाली. जि. प. शाळा येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहेत. सरकारी व खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदकडून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम सुरू आहे. गत वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी पाचवीत गेला असेल तर चौथीतील कठीण भाग किमान दोन आठवडे शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांनी थेट पुढच्या वर्गाचे शिकविण्याऐवजी काही दिवस हा ब्रिज कोर्स शिकवावा, अशी मागणी पालकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
जिल्हा परिषद शाळा १,५५७
खासगी अनुदानित शाळा ३७५
खासगी विनाअनुदानित शाळा ३९१