लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रवास करण्यावर निर्बंध लादले आहेत. मात्र तरीसुद्धा प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरु केल्या. सुरुवातीला प्रवासी संख्या अत्यल्प होती. मात्र त्यानंतर प्रवासी संख्या वाढायला लागली. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ्या वाढविल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा या चार आगारातून २२५ बसेस ८० हजार किमीचा प्रवास करीत आहेत. लॉकडाऊन नंतर प्रवासी संख्या वाढली असून महामंडळाच्या तिजोरीतही वाढ होत आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून लॉकडाऊनही सुरु झाले आहे. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र तरीसुद्धा प्रवासी संख्या जैसे थे आहे. पूर्वी सुमारे ५० ते ६० हजार दरम्यान प्रवासी वाहतूक होत होती. आताही त्याच प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंदचगाव तेथे एसटी अशी राज्य परिवहन महामंडळाने मोहीम राबवली. या मोहिमेतंर्गत जेथे रस्ता असेल तेथे एसटी धावत होती. मात्र कोरोनामुळे २३ मार्चपासून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या. परंतु, अद्यापही ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहेत. विशेष करुन जिवती, कोरपना तालुक्यातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. तसेच रात्रीच्या अनेक बसफेऱ्या बंद केल्या आहेत. ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगकोरोनानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या कमी केल्या आहेत. प्रवासी संख्या वाढल्याने बस भरुन धावत आहेत. मात्र बहुतांश प्रवासी मास्कचा वापर करताना दिसून येत नाही. तसेच बसमध्ये गर्दी राहत असल्याने एका सिटवर कधी दोन तर कधी तीनजण बसून प्रवास करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे.
बाह्य जिल्ह्यातही प्रवासी वाहतूकचंद्रपूर आगारातून अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा यासह लांब पल्ल्याच्याही बसफेऱ्या धावतात. मात्र यवतमाळ, नागपूर, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. लॉकडाऊनही सुरु आहे. परंतु, येथे बसफेऱ्या धावत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.