लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच शनिवारी तब्बल ९१ पॉझिटिव्ह आढळले. शुकवारच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० च्यावर पोहोचल्याने आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. २४ तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात ३२, चंद्रपूर तालुका १५, बल्लारपूर १२, भद्रावती ११, ब्रह्मपुरी १, सिंदेवाही १, मूल ६, राजुरा ८, चिमूर ३, वरोरा १ तर कोरपना येथे १ रुग्ण आढळून आला. नागभीड, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८९ हजार १२४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ३४१ झाली आहे. सध्या २३७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ लाख ८ हजार ६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ लाख १७ हजार ५१३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५४५ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. आरोग्य प्रशासनाने चाचण्याची संख्या वाढविली आहे. संशयित रूग्णांच्या तपासण्याकडे आता विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
गर्दीत जाणे टाळा
कोरोना वाढत असल्याने ३१ डिसेंबरला लागू केलेले सर्व निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे व सुरक्षित अंतर राखावे. स्वत:ची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर
ताप अंगावर काढू नका- कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग झाल्याची लक्षणे अगदी साधी आहेत. सर्दी, खोकला, तापावर लगेच उपचार केल्यास प्रकृती सुधारते. मात्र, चाचणी केल्यानंतर कोराेनाच होते, या भ्रमातून नागरिकांनी बाहेर यावे. जास्त दिवस ताप अंगावर काढू नये. कोरोनावरही उपचार आहेत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करावी. परंतु, ताप अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
चंद्रपुरात रूग्णवाढ चिंताजनक
- चंद्रपुरात रुग्णांची संख्या वाढू लागली. प्रशासनाने निर्बंध लागू केले. परंतु, गर्दीच्या ठिकाणी या निर्बंधांना धुडकावून लावल्याचे दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रपुरात दरदिवशी ३ ते ५ पॉझिटिव्ह आढळत होते. आता ही संख्या १० च्या पुढे गेली. शनिवारी १५ रुग्ण आढळल्याने मनपा आरोग्य प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.